‘मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल’ या विचारांना सत्यात परिवर्तीत करणारे धीरेंद्र
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती पण त्यांनी अश्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला ज्यांच्यासाठी शाळेत जाणे ही अशक्य अशी गोष्ट होती. दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात पदवी घेतलेले धीरेंद्र उत्तरप्रदेशच्या सीतापुर मध्ये ‘स्वरचना’ नावाची उच्च माध्यमिक शाळा चालवून गावातील अनेक बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देत आहे ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. धीरेंद्र हे आपल्या कामाची पाहणी आपली संस्था ‘मिलान’ मार्फत करीत आहेत.

धीरेंद्रने आपले मित्र शरद, देवाशिष व अॅनी यांच्या साथीने २००८ मध्ये ‘मिलान’ ची सुरुवात केली. ते सांगतात की, ‘जेव्हा मी सीतापुर मधील मुलांच्या प्रगतीचे काम सुरु केले तेव्हा जाणवले की देशात विकासाच्या दरम्यान साक्षरता मोहीम राबवण्याच्या गोष्टी होतात. परंतु गावाकडे शाळेत १५० मुलांसाठी फक्त दोन शिक्षक होते व त्यातील एका शिक्षकाचा अर्धा वेळ तर मुलांचे दुपारचे जेवण बनवण्यातच खर्च होतो. पण मला वाटते की सिस्टीम(व्यवस्था प्रणाली) मध्ये राहून त्यावर ताशेरे मारणे सोपे असते परंतु त्याच सिस्टीम मध्ये राहून त्यात सुधारणा करणे हे आव्हानात्मक असते व मी अशाच आव्हानांचा स्वीकार केला.’

या कामाला सुरुवात करण्याआधी धीरेंद्र यांना इंडिया फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत उत्तराखंड मधील मुलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर परत सीतापुरला आल्यावर त्यांच्या लक्षात आले की गावात शाळा दूर आहे व तिथे शिकणारे जास्त आणि शिकवणारे कमी आहेत. ही समस्या निवारण्यासाठी त्यांनी गावक-यांना सांगितले की मी गावात एक शाळा उघडू इच्छित आहे जिथे तुमची मुले शिकू शकतील. यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गावात एक एकर जमीन मिळवली तसेच गावकऱ्यांनी त्यांना शाळा सुरु करण्यासाठी एक लाख रुपयाची मदत केली. धीरेंद्र यांना शाळेचा कोणताही अनुभव पाठीशी नव्हता किंवा त्यांनी याबाबत कधी विचार केला नव्हता. पण परिस्थिती अशी बनली की मागे वळणे अशक्य होते. ते परत दिल्लीला आले व शाळा उघडण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालात मोहीम (कॅम्पेन) राबवल्या. त्याच्या मदतीने त्यांनी दोन लाख रुपये जमा केले. याशिवाय एका एजन्सीद्वारे इतर निधीची व्यवस्था झाली.

सुमारे ४८ मुलांबरोबर धीरेंद्र यांनी सन २००८ मध्ये ‘स्वरचना’ नावाच्या माध्यमिक शाळेची स्थापना केली. जिथे आज ४०० पेक्षा जास्त मुले आपले भविष्य घडवीत आहेत. धीरेंद्र सांगतात की, ‘माझा उद्देश फक्त शाळा सुरु करण्याचा नव्हता तर ज्या मुलींचे शिक्षण काही कारणाने अपूर्ण राहिले आहे त्यांना पुन्हा प्रवेश देऊन त्यांचे शिक्षण उच्च माध्यमिक पर्यंत पूर्ण करण्याचा होता.’

आपल्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी जवळपासच्या अनेक सरकारी शाळांशी बांधिलकी केली व त्याला नाव दिले ‘मिलान आउटरीच प्रोग्राम’. याअंतर्गत त्यांनी २० सरकारी शाळेतील ६ वी ते ८वी च्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या अनुभवाबद्दल धीरेंद्र सांगतात की, ‘या कामाची सुरुवात आम्ही उत्तरप्रदेशच्या बलरामपुर जिल्ह्यातून सुरु केली तेव्हा ६ वी ते ८ वी च्या मुलांना हिंदीमध्ये फॉर्म भरता येत नव्हता. सरकार आज ‘राईट टू एज्युकेशन’ च्या अंतर्गत अनेक शाळा उघडून नवीन शिक्षकांची भरती करीत आहे. तरीदेखील एका अहवालानुसार १०० विद्यार्थ्यांच्या मागे एकच विद्यार्थी १२ वी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण करू शकतो.’
या गोष्टीला लक्षात घेऊन गावातील शिक्षित तरुणांबरोबर धीरेंद्र यांनी ‘लाईफ स्कील प्रोग्राम’ तयार केला. ते तीन चरणांमध्ये काम करतात. पहिल्या चरणात तरुण मुले शाळेत जाऊन मुलांना पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर माहिती देतात. दुसऱ्यात १० मुले साहसी कार्यक्रमाद्वारे लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देतात. तिस-यात शिक्षक व पालक मिळून शिक्षणाचा स्तर वाढवण्याचा प्रयत्न करतात.

धीरेंद्र व त्यांची टीम अनेक वर्षांपासून मुलींना जास्तीत जास्त शाळेत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. याच गोष्टीला लक्षात ठेऊन त्यांनी ‘गर्ल आयकॉन फेलोशिप प्रोग्राम’ सुरु केला आहे ज्यात १२ ते १८ वर्षाच्या मुलींचा सहभाग आहे. ज्याअंतर्गत या मुली समाजात राहून लोकांच्या जीवनात बदल घडवून शिक्षण क्षेत्रात पण काम करीत आहेत. हा दोन वर्षाचा लीडरशिप कार्यक्रम आहे जो २०१५ मध्ये सरकारच्या समन्वयाने सुरु केला आहे. धीरेंद्र सांगतात की, ‘जेव्हा आम्ही यासाठी अर्ज मागवले तेव्हा २२०० पेक्षा जास्त अर्ज आलेत व ते बघून आम्हालाही आश्चर्य वाटले पण त्यातून आम्ही फक्त १० मुलींची निवड केली.’
धीरेंद्र सांगतात की, या मुलींचे यश हीच त्यांच्यासाठी एक प्रेरणा आहे. ही टीम लोकांपर्यंत जाऊन मुलींच्या कामाची प्रशंसा करतात व सांगतात की त्या सुद्धा समाजाचा एक भाग आहे, जर त्यांनी एक पाऊल पुढे टाकले तर इतर मुली का नाही करू शकत. ते सांगतात की ‘मिलन’ चा उद्देशच मुलींमध्ये शिक्षणाचा प्रचार करून त्यांना पुढे जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींना दूर करण्याचा आहे. धीरेंद्र हे मान्य करतात की लोकांची विचारधारा बदलण्यास उशीर लागेल पण त्यांच्या सहाय्यकांच्या मदतीने त्यांनी स्त्रियांना समजावले की मुलींना शिकवले तर त्या मागे न रहाता आत्मनिर्भर बनतील.
आपल्या कार्यात येणाऱ्या अडचणींबद्दल धीरेंद्र सांगतात की मुलींना शाळेत पाठवण्यासाठी गावकऱ्यांना समजावणे आज पण कठीण काम आहे. गावकऱ्यांना वाटते की मुलींना जास्त शिकवले तर मुलगा पण जास्त शिकलेले शोधावा लागेल. तसेच पालक मुलींच्या शिक्षणासाठी जास्त खर्च करायला तयार नसतात. ते मुलींना काही काम नसल्यावरच शाळेत पाठवतात. तरीदेखील धीरेंद्र व त्यांची टीम मुलींना शिकवण्यासाठी व पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करत आहे.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
जुनून...वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा
शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'
दिव्यांग मुलांचे आयुष्य आनंदमय होण्यासाठी सोनाली यांनी सोडली पत्रकारितेची नोकरी !
लेखिका : गीता बिश्त
अनुवाद : किरण ठाकरे