कॉलेज, नोकरीधंदा संभाळत स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्यासोबतच शिक्षणापासून वंचित असलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न काही तरुणांनी पाहिलं आणि जुनून फाउंडेशनची स्थापना झाली. ठाणे जिल्ह्यातील काही तरुण तीन वर्षापूर्वी एकत्र आले आणि लोकसहभागातून पालघर व ठाणे जिल्ह्यात शिक्षण, पर्यावरण व संबंधित क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. तरुणांच्या उर्जेला एकत्र बांधण्यासाठी जुनून संस्थेची स्थापना झाली आणि वेगवेगळ्या शाळा आणि ग्रामपंचायतींसोबत काम करत सामाजिक विकासामध्ये जुनूनने अल्पावधीतच भरीव योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी व कृतज्ञतेच्या विचारांनी एकत्र आलेल्या होतकरू तरुणांनी स्थापन केलेली ही एक सामाजिक संस्था. 'उम्मीद' या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘जुनून’ शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते.

सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा मुलभूत मार्ग असल्याने पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून स्वावलंबी बनविण्याचा निर्धार ‘जुनून’ने केला आहे. याची वाडा तालुक्यातील गुंज आश्रमशाळेत यशस्वीपणे सुरुवातही केलीआहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांना शैक्षणिक विषय सोप्या पद्धतीने शिकविले जातात. विविध प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून विषय सोपे करुन शिकविले जातात. विविध संकल्पना दृकश्राव्य माध्यमांतून समजावून सांगितल्या जात आहेत. शाळांमध्ये ‘ओरिगामी' आणि वैज्ञानिक खेळण्यांचे वर्कशॉप घेणे तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यामधील सर्जनशीलतेला वाव मिळावा याकरिता त्यांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. भविष्यात जबाबदार नागरिक बनणाºया मुलांमध्ये नैतिक जीवनमूल्ये रुजविणे हा सुद्धा उम्मीद मागचा महत्वाचा उद्देश आहे.

मागच्या शैक्षणिक वर्षात राबवलेल्या या उपक्रमास मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे यावर्षी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून शाळेच्या सुरुवातीच्या दिवसात मुलांना भरपूर पुस्तकांची भेट देऊ शकणार आहेत. सर्वजण या उपक्रमास सहभागी होण्यासाठी फेसबुक, वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. बहुतांश विद्यार्थी हे मराठी माध्यमातील असल्याने मुख्यत: मराठी भाषेतील काल्पनिक गोष्टी, चित्ररूपी गोष्टी, थोर व्यक्तींची चरित्रे यांसारखी पुस्तके जुनूनतर्फे सुचविली जातात.

मुलं निरीक्षणातून, कृतीतून व अनुभवाने भरपूर काही शिकत असतात. त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी तसेच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा यासाठी जुनूनमार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आम्ही विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याचे सक्रीय कार्यकर्ता ओमकार घरत सांगतो.
काय आहे 'उम्मीद बुक बँक प्रोजेक्ट' ?
मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जुनून फाउंडेशनने २०१५-१६ वर्षापासून उम्मीद बुक बँक या उपक्रमासाठी सोशल मिडियाद्वारे आवाहन केले होते. या आवाहनास समाजाच्या सर्व स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. बघता बघता विविध भाषांतील काल्पनिक गोष्टी, चित्ररूपी गोष्टी, चरित्रे, कथा-कादंबऱ्या यांसारख्या विविध प्रकारची जवळपास ६०० पुस्तके जुनूनकडे जमा झाली.
या उपक्रमात अंतर्गत गोळा झालेली पुस्तके गुंज आश्रमशाळा आणि परिसरातील इतर तीन शाळांमध्ये मुलांना दिली जातात व दर महिन्याला त्यांचे शाळा-शाळांमध्ये वाटप केले जाते. विशेष म्हणजे पुस्तकांची नियोजन करण्याची धुरा विद्यार्थ्यांवरच सोपवण्यात आली आहे. परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही हा पुस्तकठेवा वापरता यावा आणि त्यातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी याकरिता वाचानालये, वाचनप्रेमी यांचाशी जोडले जाऊन ही पुस्तके अधिकाधिक जणांना वाचनास मिळावीत हा जुनूनचा प्रयत्न आहे.

सोशल मीडियाची मदत
जुनून च्या प्रत्येक उपक्रमात फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा मोलाचा वाटा आहे. कामाचे नियोजन करणे, वाटप करणे यासाठी या माध्यमांचा सकारात्मक वापर केला जातो. "जुनूनने अल्पावधीतच अनेक अभिनव उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबवले आहेत. आमच्याबरोबर वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी झालेले स्वयंसेवक, इतर सामाजिक संस्था आणि हितचिंतकांच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाले आहे," संस्थापक युवराज पाटील सांगतात.
यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :