भावनाप्रधान सिनेमांची अनभिषिक्त सम्राज्ञी - अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये
१९८१ साली चक्र या हिंदी सिनेमातनं नसिरुद्दीन शहा यांच्यासमवेत एक मराठमोळा चेहरा चमकला हा चेहरा होता अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांचा. यानंतर १९८५ साली वहिनीची माया, १९८९ साली बाळाचे बाप ब्रह्मचारी, १९९० मध्ये शुभ बोल नाऱ्या, लपवा छपवी, येडा की खुळा सारख्या मराठी सिनेमातनं त्यांनी विविध भूमिका रंगवल्या. यादरम्यान त्यांनी अशोक सराफ, दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन यांसारख्या त्यावेळच्या सुपरस्टार नायकांसोबत कामं केलीत. अर्थातच त्यावेळच्या त्यांच्या भूमिका या नायिकेच्या अथवा सहकलाकाराच्या होत्या. पण त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख दिली ती माहेरची साडी या सिनेमातल्या लक्ष्मीच्या भूमिकेनं.
“माहेरची साडी या सिनेमातल्या लक्ष्मीने मला अभिनेत्री म्हणून या सिनेसृष्टीत अढळ स्थान मिळवून दिलं, यासाठी मी निर्माता दिग्दर्शक विजय कोंडके यांचे आभार मानेन, मला आठवतंय लक्ष्मीच्या या भूमिकेसाठी त्यावेळची आघाडीची अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचा पाठपुरावा केला जात होता. पण शेवटी ही भूमिका मला मिळाली, जणू काही या भूमिकेने माझी निवड आधीपासून कायम केली होती.

माहेरची साडी या सिनेमानं तिकीट खिडकीवर यशाचे अनेक रेकॉर्ड बनवले जे आजही कायम आहेत.ज्याचा मला अभिमान आहे. त्यानंतर मात्र माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भूमिका या त्याग, सोशिकपणा, दुःखी, कष्टी अशा नायिकेच्या होत्या. मी ही त्या स्वीकारत गेले, ज्याची मला अजिबात तक्रार नाही मराठीचा तो काळ अशाच सिनेमांचा होता. माझ्या आधीच्या सुलोचना ताई, जयश्री गडकर या अभिनेत्रींनीही अशाच सोशिक भूमिका पडद्यावर साकारल्या आणि अजरामर केल्यात. ”
अलकाताईंचे आत्तापर्यंतचे सिनेमे आणि त्यांच्या तथाकथित रडूबाई भूमिका यांना विविध शोमधून उपरोधिक पद्धतीने सादर केले जाते. एखादी अभिनेत्री पडद्यावर ढसाढसा रडताना दिसली की तिला हमखास मराठीतली अलका कुबल म्हणून बोलवलं जातं. अलका ताईंना याचा आनंदच वाटतो. “माझी पडद्यावरची सोशिक आणि सोज्वळ स्त्रीची इमेज इतकी भक्कम बनत गेली की प्रत्यक्ष आयुष्यात जो कोणी मला भेटायचा तो मला अलकाताईच म्हणू लागला अगदी एखादा दारुडा जरी माझ्यासमोर आला तर ताई तुमचा हा सिनेमा ना...असं म्हणतंच सुरुवात करतो. ”

मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनसोबत सिनेमांचा आणखी एक प्रेक्षकवर्ग महाराष्ट्रात स्वतःचे स्थान पक्क धरुन आहे आणि तो म्हणजे जत्रेतला सिनेमा. आणि या सिनेमांमध्ये गेली कैक वर्ष स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री अलका कुबल आठल्ये.
“जत्रेतला सिनेमा म्हंटलं की शहरातली माणसं भुवया उंचावतात, त्यांच्या लेखी मनोरंजनाचं हे माध्यम सुमार दर्जाचं असतं. अर्थात मराठी सिनेसृष्टीत आजही या जत्रेतल्या सिनेमांना एक वेगळं वलय आहे, मुळात या सिनेमांचे अर्थकारण हे शहरातल्या सिंगल स्क्रिन थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सपेक्षा वेगळं आहे. गावाकडच्या जत्रांमध्ये तंबू ठोकून त्यात सिनेमा लावण्यापासून, त्या सिनेमाचं प्रमोशन करणं, त्या तिकीटांचे दर आणि त्यातनं सिनेमाचा होणारा व्यवसाय हा खरंतर अभ्यासाचा विषय आहे. एक अभिनेत्री आणि निर्माती म्हणून मी हे सर्व जवळून पाहिले आणि अनुभवलेही.”

अलका ताई सांगतात, “ खूप वर्षांपूर्वी असाच माझा एक सिनेमा जत्रेमध्ये लागला होता आणि मी तिथल्या बुकिंग ऑफिसमध्ये बसले होते. तेव्हा माझ्या सिनेमाचा निर्माता आता आला आणि मला बोलला की तुम्हाला भेटायला एक अत्यंत वयस्कर जोडपं आलंय तुम्ही भेटणार का त्यांना मी हो बोलले आणि बाहेर आले तर एक अत्यंत गरीब, जर्जर झालेले कपडे घातलेलं वयस्कर जोडपं माझ्या समोर उभं होतं त्यांनी माझ्या माहेरची साडी सिनेमातल्या लक्ष्मीच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि मला बक्षिस म्हणून पैसे देऊ केले. मला आठवतंय त्या नवरा बायकोंनी अगदी शोधून शोधून आपल्याकडले पैसे जमा केले होते आणि अकरा रुपये माझ्या हातावर टेकवले. मला अक्षरशः भरुन आलं, मी लगेच त्यातला एक रुपया काढला आणि दहा रुपये त्यांना परत दिले आणि त्यांचे आभार मानले. आजही तो एक रुपया मी माझ्याजवळ ठेवलाय असं निस्वार्थी प्रेम हे फक्त जत्रेतल्या सिनेमामधूनच मिळू शकतं.”
“माझ्यावर अनेक टीकाही झाल्या म्हणजे मी जत्रेतल्या सिनेमांमध्ये वाजवीपेक्षा अधिक सहभाग दाखवतेय. अलकाताई बुकिंग ऑफिसमध्ये बसून स्वतःतिकीट विकतायत, अभिनयाबरोबरच त्यांनी हा नवा व्यवसाय सुरु केला, अशा चर्चाही माझ्यासंदर्भात घडवल्या गेल्या.पण मी कधीच असं काही केलं नाही. जत्रेतल्या सिनेमांमध्ये मी कलाकार म्हणून उपस्थिती लावत आलीये. त्यावेळी माझी स्वाक्षरी असलेले फोटोज ही चाहत्यांना दिले जायचे, फोटो साईन करण्यासाठी मी तिथे बसायची, प्रेक्षकांच्या गर्दीत मला त्रास नको व्हायला म्हणून निर्माते मला बुकिंग ऑफिसमध्ये बसवायचेत एवढंच.”
नुकताच अलकाताईंची निर्मिती असलेला धनगरवाडा सिनेमा प्रदर्शित झाला. धनगरी समाजावर आधारित या सिनेमाचा विषय प्रबोधनपर आहे. अभिनेत्री म्हणून गेली अनेक वर्ष मी या सिनेसृष्टीत सक्रीय राहीलेय अजूनही काम करतेय अशावेळी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या या समाजाप्रती आपली जबाबदाऱी पार पाडण्याचा प्रयत्न त्या निर्मात्या म्हणून करतायत.