Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारी 'महाराष्ट्र मंडळे'

परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारी 'महाराष्ट्र मंडळे'

Sunday May 01, 2016 , 7 min Read

।। लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

मराठी अभिमान गीतातील पंक्ती साजेशा ठरतात त्या परदेशातील महाराष्ट्र मंडळांना. नोकरीनिमित्त आपल्या जन्मभूमीपासून लांब कर्मभूमीत स्थायिक झालेल्या लोकांना काही केल्या आपल्या मातृभूमीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. परदेशातही ते आपापल्या परीने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. परदेशात स्थायिक झालेल्या अनेक महाराष्ट्रीयन लोकांनी तेथे महाराष्ट्र मंडळे स्थापन केली आहेत. त्याद्वारे ते आपले उत्सव साजरे करत आपली संस्कृती जपण्याचा तर प्रयत्न करत असतातच, त्यासोबतच पुढील पिढीलादेखील संस्कृतीची ओळख करुन देत असतात. परदेशातील महाराष्ट्र मंडळे तेथे मकरसंक्रात, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दिवाळी यांसारखे सण साजरे करतानाच महाराष्ट्रीन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या प्रयत्नात असतात. परदेशातील अशाच काही मंडळांचा आम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त आढावा घेतला आहे.

image


पश्चिमी ऑस्ट्रेलियाची राजधानी आणि ऑस्ट्रेलियातील चौथे मोठे शहर अशी ओळख असलेल्या पर्थमध्येही अनेक महाराष्ट्रीयन लोक नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. मराठी भाषिकांनी एकत्र येऊन तेथे २०१२ साली पर्थ महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे.

image


पर्थ महाराष्ट्र मंडळ, ऑस्ट्रेलिया - मराठी मातीशी असलेली नाळ जपण्यासाठी पर्थ महाराष्ट्र मंडळ २०१२ पासून कार्यरत आहे. महामंडळाचे सदस्यत्व हे सर्व मराठी भाषिक आणि महाराष्ट्राशी बांधिलकी असणार्‍या लोकांसाठी खुले आहे. मराठी भाषेचा, साहित्याचा आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा, पर्थमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांचे आपसातले ऋणानुबंध वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, हा महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेचा हेतू आहे. या हेतूच्या पूर्ततेच्या अनुषंगाने दरवर्षी महामंडळातर्फे महाराष्ट्र आणि मराठी भाषेशी जोडलेले सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच कोणत्याही महिन्यात पाचवा शुक्रवार आल्यास मंडळातील सदस्यांच्यावतीने पर्थमधील देवळामध्ये प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसेच दर तीन महिन्यांनी 'रेडिओ संगम पर्थ' तर्फे एफएम ९५.३वरुन मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येतो. तसेच विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच मंडळाकडून वार्षिक सहलीचेही आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र मंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना दोनशे ते अडीचशे लोकांची उपस्थिती असते. पर्थच्या एकूण मराठी लोकसंख्येच्या पन्नास ट्क्के ही उपस्थिती असते, असे मंडळाचे सदस्य सांगतात. आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना मंडळाच्या कार्यकारिणी समितीतील सदस्य सांगतात की, भविष्यात आम्ही मंडळांच्या कार्यक्रमांत लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच पर्थमध्ये नव्याने येणाऱ्या मराठी भाषिक लोकांकरिता आम्ही मार्गदर्शक फोरम सुरू करणार आहोत. मराठी भाषा, संस्कृती नव्या पिढीपर्य़ंत पोहोचवण्यासाठी तसेच मराठी सिनेमा आणि नाटके पर्थमध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात. तसेच दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालीकात मंडळाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात येतो.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यातील सर्वात मोठे आणि अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकावरील मोठे शहर म्हणजे लॉस एंजेलिस. कॅलिफोर्नियातील पाम ट्रीजच्या छायेत वसलेले एक सुंदर शहर, अशी या शहराची ओळख आहे. आज या शहरातदेखील मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय असून, तेथे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरिता त्यांनी मंडळाची स्थापना केली आहे.

image


महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस, अमेरिका – लॉस एंजिलीसचे महाराष्ट्र मंडळ मागील ४० वर्षांपासून दक्षिण कॅलिफॉर्नियातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. अवघ्या काही कुटुंबांनी एकत्र येऊन सुरू केलेले महाराष्ट्र मंडळ आज हजारो मराठी लोकांना एकत्र आणणारे त्यांचे माहेरघर झाले आहे. आजच्या तारखेस महाराष्ट्र मंडळात २५० ते ३०० कुटुंब सहभागी झाली आहेत. दरवर्षी या सभासदांमधून ११-१३ सदस्यांची कार्यकारिणी निवडली जाते. ही कार्यकारिणी दरवर्षी महाराष्ट्र मंडळातर्फे सगळे मराठी सण पारंपारिक पद्धतीने आयोजित करते. लॉस एंजिलीस सारख्या मोठ्या शहरात विखुरलेल्या मराठी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी या सणांसारखे दुसरे निमित्त नसते. याशिवाय स्थानिक कलाकारांना आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी एक मंच उपलब्ध होतो. अनेक छोट्या मोठ्या संस्थांसह मंडळ दरवर्षी आपली व्याप्ती वाढवीत आहे. आपल्या आई वडीलांचा उत्साह पाहून आज इथली अनिवासी मराठी मुले मोठ्या संख्येने मंडळात सामील होत आहेत. मंडळाचे काही विषेश उपक्रम म्हणजे फिरते पुस्तकालय, वृत्तपत्र भरारी, दिवाळी अंक 'उत्सव', मराठी शाळा आणि समाजोपयोगी उपक्रम मार्ग यांचा येथील मराठीवर्ग मोठ्या संख्येने लाभ घेतात. मराठी वाचनाची आवड असणा-यांना फिरते पुस्तकालय मराठी पुस्तकांचा संग्रह शुल्लक किंमतीत उपलब्ध करून देते. तसेच, मंडळाच्या चालू घडामोडी आणि भविष्यातील उपक्रम यांची समस्त माहिती त्रैमासिक वृत्तपत्र भरारी मधून मिळते.

'मार्ग' हा उपक्रम नवीन आलेल्या मराठी बांधवांना येथे स्थिरावण्यास मदत करण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेला आहे. लोकांच्या घर, गाडी यासारख्या प्रश्नांना किंवा विसा, नागरिकत्व याबाबतीतल्या अडचणीत महाराष्ट्र मंडळ मदत करण्याचा प्रयत्न करते. येथील अनिवासी मराठी मुलांना आपल्या मायबोलीची ओळख व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र मंडळ शाळा चालवते. या शाळा लॉस एंजिलीसमधे चार ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत अग्रेसर असणारा डेन्मार्क हा देश उत्तर युरोपात वसलेला आहे. नोकरीनिमित्त अनेक महाराष्ट्रीयन लोक तेथे स्थायिक झाले असून, त्यांनी तेथे महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे.

image


महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क - २०१२ साली जरी या मंडळाची औपचारीक स्थापना झाली असली, तरी २०१० सालापासून डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. याचे संपूर्ण श्रेय ते अनिता आणि किशोर बापट या दांम्पत्याला देतात. त्यामुळे डेन्मार्क महाराष्ट्र मंडळाची अनौपचारीक स्थापना तशी २०१० सालची. या सण उत्सवांच्या निमित्ताने कोपनहेगनस्थित मराठी कुटुंबे एकत्र येऊ लागली आणि त्यातूनच मंडळाच्या स्थापनेची संकल्पना आकार घेऊ लागली. २०१२ साली डेन्मार्क महाराष्ट्र मंडळाची औपचारीक स्थापना करण्यात आली.

उत्तर ध्रुवातल्या पऱ्यांच्या देशात,

दिवस रात्रींच्या या विचित्र खेळात,

अन्, चमचमणाऱ्या हिमांच्या इंद्रधनुष्यात,

जनांचे मंडळ बनत गेले, अन उमटला एकच आवाज,

"जनांसाठी मराठी, जनांसाठी मराठी"

'जनांसाठी मराठी', या ब्रीदवाक्यातूनच मंडळाचा मूळ उद्देश समजून घेता येतो. जे लोक मराठी बोलतात, बोलू इच्छितात किंवा ज्यांना मराठी समजते, अशा सर्वांकरिता 'महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क'चे व्यासपीठ खुले आहे. या मंडळाच्या वतीने महाराष्ट्रीय सण साजरे केले जातातच शिवाय वनभोजन तसेच वार्षिक सहल यांसारख्या उपक्रमांचे आयोजनदेखील करण्यात येते. भविष्यकाळातील मंडळाच्या वाटचालीदरम्यान मराठी कला, संस्कृती जपण्यासोबतच मराठी साहित्याचा प्रसार करण्याची त्यांची संकल्पना आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वीच डेन्मार्क महाराष्ट्र मंडळाची औपचारीकरित्या स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मंडळ सध्या बाल्यावस्थेत असून, येत्या काळात वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करुन आपला ठसा उमटवेल, असा विश्वास मंडळातील सर्व सदस्यांना आहे.

युरोपमधील एक प्रगत देश तसेच जी-७ या आंतरराष्ट्रीय संघटनेतील महत्वाचा देश म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या फ्रान्समध्येदेखील अनेक मराठी लोक स्थायिक झाले आहेत. आपली मराठी संस्कृती जपण्याकरिता त्यांनी तेथे महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे.

image


महाराष्ट्र मंडळ फ्रान्स – १ मे २००७ साली महाराष्ट्र मंडळ फ्रान्सची स्थापना करण्यात आली. फ्रान्समध्ये राहणारे महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्रात राहणारे फ्रेंच नागरिक यांच्या सांस्कृतिक, सामाजिक पैलूंचे संवर्धन तसेच विकास करण्याच्या हेतूने महाराष्ट्र मंडळ फ्रान्सची स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण, संस्कृती, विज्ञान आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये फ्रान्को-मराठी यांच्या आदानप्रदानाकरिता पुढाकार घेणे, त्याकरिता प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या विकासाकरिता प्रयत्न करणे, या मंडळाच्या भविष्यकाळातील योजना आहेत. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा यांना फ्रान्समध्ये तसेच फ्रान्स संस्कृती आणि भाषा यांना महाराष्ट्रामध्ये प्रोत्साहन देण्याचा या मंडळाचा मानस आहे. तरुण उद्योजकांना तसेच व्यावसायिकांना वेळप्रसंगी हे मंडळ मदत पुरवते.

२००८साली या मंडळाने युरोपियन मराठी संमेलनाचे तर २००९ साली ग्युमेट म्युझियम (Guimet) येथे मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. २०१३ साली त्यांनी पॅरीसच्या एका उपनगरात 'इंडिया-फ्रान्स वीक'चे आयोजन केले होते. डॉ. माशेलकर, डॉ. मोहन आगाशे, डी.एस.कुलकर्णी, अभिजीत पाटील, प्रताप पवार हे फ्रान्स महाराष्ट्र मंडळाचे मानद सदस्य आहेत.

तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियातील एक देश म्हणजे मलेशिया. या देशातही महाराष्ट्रीयन लोकांचे प्रमाण लक्षणीय आहे. मलेशियाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर येथे आलेल्या मराठी लोकांनी मिळून महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे.

image


महाराष्ट्र मंडळ मलेशिया – ऐंशी नव्वदच्या दशकात मलेशियात मराठी लोकांची संख्या वाढत गेली. कालातरांने त्यांच्या भेटीगाठी, घरगुती कार्यक्रमदेखील होऊ लागले. त्यामधील काही उत्साही मंडळींनी १९९७ साली सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला. महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ तिथेच रोवली गेली. या उत्साही लोकांना इतरांचीही साथ मिळत गेली आणि इतर सण समारंभ तसेच कार्यक्रम साजरे करण्यास सुरुवात करण्यात आली. १०-१२ जणांनी मिळून सुरू केलेल्या या मंडळाचे रुपांतर आज २००हून अधिक सदस्यांचा समावेश असलेल्या मोठ्या परिवारात झाले.

'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा'

या उक्तीनुसार मनातला 'महाराष्ट्र' आणि 'स्वदेश' जपता यावा, हे उद्दिष्ट उराशी बाळगून दरवर्षी हे मंडळ विविध कार्य़क्रमांचे आयोजन करते. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रम तसेच उपक्रमांद्वारे नव्या पिढीला मराठी भाषा, संस्कृती आणि कला यांची ओळख व्हावी, याकरिता हे मंडळ सतत प्रयत्नशील असते.

image


आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असणारा एक देश म्हणजे दक्षिण आफ्रिका (South Africa), ज्याला दक्षिण आफ्रिका गणराज्य (South Africa Republic) म्हणूनही ओळखले जाते. या आफ्रिकन देशामध्येही अनेक मराठी कुटुंबे वास्तव्यास असून, आपल्या पुढच्या पिढीला 'भारतीय' आणि त्यातही प्रामुख्याने 'महाराष्ट्रीयन' संस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी ते विविध कल्याणकारी उपक्रम राबवत असतात.

image


मराठी मंडळ दक्षिण आफ्रिका – नोकरीनिमित्त दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना एका छताखाली आणणारी 'मराठी मंडळ दक्षिण आफ्रिका' ही संस्था २००९ साली स्थापन करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील मराठी भाषिक लोकांकरिता सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजक आणि कल्याणकारी उपक्रम राबविण्याचे या संस्थेचे ध्येय आहे. विविध महाराष्ट्रीयन सण, उत्सव साजरे करत असतानाच परदेशात मराठी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ही संस्था प्रयत्न करते. तसेच नव्या पिढीतील बालकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देते. भारतापासून दूर वास्तव्यास असल्यामुळे तेथील बालकांना ते 'भारतीय' आणि त्यातही प्रामुख्याने 'मराठी'ची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करत असतात. सदस्यांकरिता अधिकाधिक यशस्वी उपक्रम राबविण्याचे तसेच त्यात सदस्यांना सहभागी करुन घेण्याचे, नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देतानाच एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, लहान मुलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी, तसेच एखाद्या सभासदाला अडचणीच्या वेळेस सर्वतोपरी मदत करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते.