तबल्याचा प्रचार आणि प्रसार या ध्येयानं झपाटलेल्या आदित्यनं साडेचार वर्षांचा असल्यापासून तबला शिकायला सुरवात केली. गेली तेवीस वर्ष तो हे झपाटलेपण अनुभवतोय. आदित्य अनेकांना ही कला शिकवतो. त्याची ही तबल्याची नशा आज भारत देशाच्या सीमारेषा ओलांडून पार अमेरिकेत पोहोचली आहे. मुंबईत कामानिमित्तानं आलेल्या एका अमेरिकन बाबाची दोन लहान मुलं आदित्यकडे तबला शिकायला येऊ लागली. या दोन लहानग्यांनाही आदित्यप्रमाणेच तबल्याच्या वेडानं झपाटून टाकलं. दोन वर्ष शिकून ही मुलं आपल्या देशात परत गेली. मात्र त्याचं हे झपाटलेपण काही जाईना. तालाची, ज्ञानाची भूक त्यांना स्वस्थ बसू देई ना. इथे आदित्यालाही त्यांचं शिकणं अर्धवट राहिल्याची चुटपूट लागून राहिली होती. काय करता येईल या विचारात असतानांच ऑनलाईन पर्याय वापरावा असं मनात आलं. स्काइप, हॅगआउट, OOVOO असे व्हिडिओ चॅटचे पर्याय ट्राय केले आणि तबल्याचे बोल अमेरिकेतही घुमू लागले. आता अमेरिका, युकेमधल्या भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांनाही आदित्य तबला शिकवतो.

या ऑनलाईन शिकवणीमध्ये इंटरनेटचा स्पीड उत्तम असेल तर अगदी समोर बसून शिकतोय असंच वाटतं. काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त खूप अर्लट रहावं लागतं. अगदी तुमचे पाचशे टक्के लक्ष केंद्रित करावं लागतं. थोडं अधिक लाउड बोलावं आणि वाजवावं लागतं. शिवाय माइक आणि हेडफोन्स वापरल्यानं तबल्याचा आवाज एकदम क्लीन येतो.

आदित्य गेली आठ- नऊ वर्षे भारतीय आणि परदेशी मुलांना तबल्याचे धडे देतोय. पण त्याला या शिकवण्यात भाषा किंवा संस्कृतीचा अडसर कधीही जाणवला नाही. तुम्हाला हिंदी-मराठी येत नसेल, या देशाची संस्कृती माहिती नसेल तरीही काही फरक पडत नाही. तबला शिकायला कोणत्याही भाषेची अडचण मला कधीच जाणवली नाही. एकदा तुम्ही तबल्याशी कनेक्ट झालात की तबला तुमचे हात कधीच सोडत नाही. म्हणूच आदित्यनं सहा महिन्यांपूर्वी ‘तबलाकनेक्ट’ ही संस्था सुरु केलीय. या संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी तबला वादनाचे कार्यक्रम केले जातात. ३ जानेवारी २०१६ ला होणाऱ्या कार्य़क्रमात प्रसिद्ध तबलावादक आदित्य कल्याणपूर यांची कला आदित्यच्या विद्यार्थ्यांना आणि लोकांनाही ऐकायला मिळणार आहे.
तबला हा माझा जीव की प्राण आहे. गेली जवळपास तेवीस वर्ष तो माझ्याबरोबर आहे. म्हणूनच तबलावादनाची ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सतत झटत रहाण्याचं व्रत आदित्यनं घेतलं आहे.