तुमच्या कुटुंबात एक चार पायांचा सदस्य आहे का ? आणि बाहेरगावी जाताना या तुमच्या लाडक्या सदस्याला (पेटला) कुठे ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर DRT cannels एक उत्तम पर्याय ठरु शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर 'कुत्र्यांसाठीचं लॉजिंग-बोर्डिंग'. मुंबईजवळच्या काशिमीरा इथं अंकिता टिक्का-भालेकर कुत्र्यांसाठीचं हे सेकंड होम चालवते. अंकिताला स्वतःला कुत्र्यांची खूप आवड. मात्र रहातं घर पुरेसं मोठं नव्हतं. त्यामुळे मग एका ओळखीच्यांनी स्वतःच्या फॅक्टरीवर जागा देऊ केली. तिथे अंकिताच्या कुत्र्याची सोय झाली, मग आणखी काही लोकांनी आपले पाळीव कुत्रे तिथे आणून ठेवले. असं करता करता हा पसारा वाढत गेला आणि आज अंकिताच्या डॉग्स् कॅनल्समध्ये वीस कुत्र्यांचं रहाणं, जेवण-खाणं, वॉक अशी उत्तम व्यवस्था आहे. कुत्र्यांच्या देखभालीसाठी ट्रेनर्स आहेत. गेल्या सहा वर्षांत जवळपास साडेतीनशे कुत्र्यांनी या लॉजिंग-बोर्डींगमध्ये हजेरी लावली आहे.
लोकं वेगवेगळ्या कारणांसाठी आपले कुत्रे कॅनल्समध्ये ठेवतात. कोणाच्या घरी मुलांच्या परीक्षा चालू असतात. कोणाला प्रवासासाठी बाहेरगावी जायचं असतं. तर फेस्टिव सिझन म्हणजे गणपती, नवरात्री, दिवाळी, क्रिसमस आणि न्यू इअरपर्यंत इथे छोट्या पाहुण्यांची वर्दळ सुरु असते. फटाक्यांची कुत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे दिवाळीत अनेक मालक आपल्या कुत्र्यांना आमच्याकडे ठेवतात.
आमच्याकडे जेव्हा कुत्रे आणले जातात तेव्हा काही फॉंर्मलिटीज् आम्हाला कराव्या लागतात. तुम्हाला कोणताही कुत्रा पाळायचा असेल तर त्यासाठी कॅनल क्लब ऑफ इंडीयाचं रजिस्ट्रेशन लागतं आणि महानगरपालिकेकडे नोंदणी करावी लागते. हे रजिस्ट्रेशन, कुत्र्यांचं लसीकरण आणि जंत होऊ नयेत म्हणून दिलेलं औषधं याचा रेकॉर्ड तपासून मगचं आम्ही कुत्र्यांना दाखल करुन घेतो.
अनेकदा आपलं घर आणि मालकाला सोडून आल्यामुळे हे कुत्रे आक्रमक झालेले असतात. घाबरलेले असतात. कुत्रे हे नेहमी वासावरुन माणसं लक्षात ठेवतात. त्यामुळे आमच्याकडे कुत्रे घेताना त्यांना प्रिय असणाऱ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा शर्ट, टी शर्ट, साडी आम्ही मागून घेतो. त्या कपड्यांना तुमचा वास असतो. त्यामुळे तुमच्या कुत्र्याला सुरक्षित वाटतं. काही कुत्रे आक्रमक होतात. कोणालाच जवळ येऊ देत नाहीत. अशावेळी आमचे ट्रेनर्स कुत्र्यांबरोबर खेळतात. त्यांच्याशी दोस्ती करतात. मग हळूहळू हे कुत्रे आमच्याकडे रुळतात. जेवतात. प्रत्येक एन्ट्रीच्यावेळी आम्ही मालकांकडून त्यांच्या कुत्र्यांच्या आवडी निवडी विचारुन फॉर्म भरुन घेतो. मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त आम्ही कोणताही कुत्रा आमच्या कॅनल्समध्ये ठेवत नाही. सहा- आठ महिन्यांपेक्षा मोठे आणि दहा-अकरा वर्षांपर्यंतचे लहान-मोठे सगळेच कुत्र्यांची उत्तम सोय आमच्याकडे आहे. इंग्लिश/ अमेरिकन कॉकरस्पॅनिअल, पुडल,शीत्सझू , पॉमेरीअन अशा छोट्या जाती तर बॉक्सर, डॉबरमॅन, लॅबरेडॉर, जर्मन शेफर्ड अशा मोठ्या जाती गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. अनेकदा मोठे कुत्रे प्रचंड आक्रमक असतात. दोन मोठ्या कुत्र्यांना शेजारी ठेवलं तर एकमेकांवर भुंकून ते हैराण करतील, तसंच माजावर आलेली कुत्री असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. तिच्यासाठी वेगळे डायपर वापरावे लागतात. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक कुत्र्याची वैयक्तिक देखभाल केली जाते. अनेक कुत्रे हे शाकाहरी असतात, आमच्याकडे आल्यावरही त्यांचं रुटीन बदलणार नाही याची आम्ही काळजी घेतो.
तुमचा कुत्रा तुम्हाला जितका प्रिय आहे तितकाच तो आम्हालाही जवळचा आहे.

म्हणूनच कुत्रे पाळणाऱ्यांसाठी काही खास टीप्स अंकिता देते. कुत्र्यांना बोलता येत नाही, पण आपल्या बॉडी लँग्वेजमधून ते बरचं बोलत असतात, आपल्याला सांगत असतात. कुत्र्याची शेपटी जर डाव्या उजव्या बाजूला हलत असेल तर तो तुमच्याशी खेळण्याच्या मूडमध्ये आहे आणि जर त्याची शेपटी त्याच्या मागच्या पायांच्यामध्ये असेल तर तो खूप घाबरलाय असा त्याच्या अर्थ होतो. कुत्रे हे जन्मापासूनच उत्तम स्वीमर असतात. त्यांना पाण्यात खेऴायला आणि पोहायलाही आवडतं,तशी संधी त्यांना द्या, त्यांचं लसीकरण योग्यवेळी करा तसंच त्यांना जंत होऊ नयेत यासाठी औषधं द्या. तुमच्या घरी जर नवीन बाळ येणार असेल तर कुत्रा पाळू नका. कारण त्याच्या केसांमुळे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो.
.jpg?fm=png&auto=format)
या मुक्या प्राण्याची आपल्या मालकानं आपल्यावर प्रेम करावं एवढीच अपेक्षा असते. ती तुम्ही पूर्ण केलीत तर तुमच्यासाठी जीव द्यायलाही तो मागे पुढे पहाणार नाही.