लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे लक्ष्य
केतन देशपांडे जेंव्हा पहिल्यांदा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांना भेटले, तेंव्हा कलाम त्यांना म्हणाले, “ एक लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आणि मला भेटा.” ही करामत केल्यानंतर केतन पुन्हा एकदा कलाम यांना भेटायला गेले, यावेळी कलाम म्हणाले, “ पाच लाख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आणि मला भेटा.” तिसऱ्या भेटीत हा आकडा एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहचला.

दुर्दैवाने त्यानंतर मात्र मिसाईल मॅनबरोबर केतन यांची कधीच भेट होऊ शकली नाही, पण त्यांचे शब्द मात्र सदैव त्यांच्या कानात निनादत राहिले.... लक्ष्य स्पष्ट करणारे शब्द – परिणाम साधत रहा.... आता थांबणे नाही.....

केतन यांनी २००७ मध्ये एफयुईएल (फ्युएल) (Friends Union for Energising Lives) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. शहरी आणि ग्रामीण भागातील कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविणे आणि त्यांना प्रशिक्षण आणि संधी देऊन, मदत करणे, हे संस्थेचे लक्ष्य आहे. ‘कॅच देम यंग’ हे या संस्थेचे तत्व.... विद्यार्थी १३-१४ वर्षांचे असतानाच, ‘फ्युएल’च्या इंटर्वेन्शन प्रोग्रॅम्सना सुरुवात होते.
या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी २०१३ मध्ये त्यांना अशोका फेलोशीप देऊन गौरविण्यात आले आहे.
विद्यार्थी उद्योजकाचा उदय
केतन यांना त्यांच्या आईनेच वाढविले. त्या स्वतः एक न्यायाधीश होत्या. त्यांना दर तीन वर्षांनी शहर बदलावे लागे. सातत्याने होणाऱ्या या बदल्यांचा दुसरा अर्थ म्हणजे दर वेळा नव्या शाळांचा आणि नव्या वर्गांचा शोध... बहुतेकवेळा त्यांच्या आईची बदली झालेल्या छोट्या गावामध्ये शैक्षणिक व्यवस्थेबाबत माहितीचा अभाव असल्याने, ही गोष्ट म्हणजे एक सततचे आव्हानच होते. २००४ मध्ये ते पुण्याला आले. पुण्यासारख्या मोठ्या शहरांत आल्यावर तरी आपले हे क्लेष संपतील, असे त्यांना वाटले होते, पण इथे त्यांना मोठ्ठाच धक्का बसला. “ मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि पुढे कोणता अभ्यासक्रम घ्यायचा, कोणत्या महाविद्यालयात जायचे, याचा निर्णय घ्यायचा होता. पुणे हे एक मोठे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे, इथे तरी विविध शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक्रमांची माहिती मिळणे सहजपणे मिळण्याची मला अपेक्षा होती. पण लवकरच माझ्या लक्षात आले की, उच्च शिक्षणाबाबतचा माहितीचा अभाव ही काही केवळ ग्रामीण भाग किंवा छोट्या शहरांपुरतीच मर्यादीत समस्या नसून, मोठ्या शहरांतील परिस्थितीही काही वेगळी नाही,” ते सांगतात.
केतन यांनी पुण्याच्या एका महाविद्यालयातून समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली. महाविद्यालयात असतानाच कधीतरी त्यांना उद्योजक बनण्याचा किडा चावला. उद्याेजकेतेचे अभ्यासक्रम देऊ करणारी काही महाविद्यालयेही होती, पण हव्या त्या अभ्यासक्रमाकडे सर्वसमावेशक पद्धतीने बघण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध नव्हते. माहिती आणि मार्गदर्शनाचा हा अभाव स्वतः अनुभवल्याने वैतागलेल्या केतन यांना एक गोष्ट चांगलीच समजली, की भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला अशाच समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातूनच २००६ मध्ये त्यांना फ्युएलची संकल्पना सुचली. त्यांनी प्रथम त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि माहिती जमविण्यासाठी त्यांच्या एकत्रित अनुभवाचा वापर केला. सुरुवातीला हे पुण्यातील महाविद्यालये आणि लोकप्रिय अभ्यासक्रमांपुरतेच मर्यादीत होते, त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्येही याचा विस्तार करण्यात आला. जरी केतन हे एक गुणवंत विद्यार्थी म्हणून पदवी मिळविण्यात यशस्वी ठरले असले, तरी वर्गात प्रत्यक्ष हजेरी लावल्याचे त्यांना आठवतही नाही आणि त्यांच्या मते फ्युएलची स्थापना करतानाच त्यांना खरे शिक्षण मिळाले. हे करत असताना, ते निधी उभारण्यास तर शिकलेच, पण त्याचबरोबर टीमच्या सदस्यांना एकत्र करण्याची आणि त्यांचे नेतृत्व करण्याची, संस्थेचे विपणन करण्याची आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची शिकवणही त्यांना याच अनुभवातून मिळाली.
त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनातून मिळालेल्या माहितीच्या आधारे केतन सांगतात की, भारतातील ग्रामीण भागात, माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त सात टक्के विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात आणि यामागची प्रमुख कारणं म्हणजे, त्यांना उपलब्ध संधींची माहितीच नसते किंवा हे शिक्षण त्यांना परवडत नाही किंवा यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक असलेली माहिती आणि कौशल्ये त्यांच्याकडे नसतात.
त्या पुढे ते सांगतात, “ आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी संख्येचा विचार करता, भारत ही चीन आणि अमेरिकेपाठोपाठ जगातील शिक्षणाची तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मात्र सुयोग्य अर्जदार विद्यार्थ्यांच्या अभावी देशातील महाविद्यालयांतील वीस टक्के जागा रिकाम्या रहातात. एकूण गुणवंत विद्यार्थ्यांपैकी नोकरी मिळण्यायोग्य भारतीय पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रमाण हे केवळ १५ ते २५ टक्के एवढेच असल्याचा अंदाज आहे.”
माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि नोकऱ्यांच्या बाजारपेठेशी जोडू शकेल अशी व्यवस्थाच आज उपलब्ध नाही आहे, खास करुन कमी उत्पन्न गटाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी... वेगाने प्रगती करणारी, कमी स्पर्धा आणि नोकरीच्या जास्त संधी असणारी इतर विविध क्षेत्रं आज उपलब्ध असतानाही, पारंपारीकरित्या बहुतेक भारतीय पालक हे आपल्या मुलांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा कायद्याचे शिक्षण घ्यावे, याच मताचे असतात. यात भर म्हणजे, महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात, ज्यासाठी वेगवेगळा अभ्यास आणि तयारी करण्याची गरज असते. याचाच अर्थ, विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होण्याच्या दोन वर्षे आधीपासूनच त्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या कारकिर्दीच्या निवडीबाबतचा महत्वाचा निर्णय घेणे गरजेचे असते. बहुतेक वेळा कुटुंबातील पहिली शिक्षित पिढी, तसेच अनेक कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आयुष्य बदलणाऱ्या निवडींसाठी पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही.
यावर उत्तर? सर्व विद्यार्थ्यांना सहजपणे उपलब्ध असणारी माहिती, अगदी आठव्या इयत्तेपासूनच...
२००७ मध्ये त्यांनी फ्युएलची अधिकृत नोंदणी केली आणि कामाला जोरात सुरुवात केली. उच्च शिक्षण आणि कारकिर्दीच्या संधींची माहिती देणारा एक विश्वासार्ह डेटाबेस तयार करण्यासाठी त्यांच्या टीमने कठोर मेहनत घेतली. त्यांच्या माणसांनी ग्रामीण भागांतील शाळांमध्ये शिकणाऱ्या सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून, त्यांच्या कारकिर्दीसाठी मूल्यांकन चाचण्या घेण्याच्या आणि त्यांना कारकिर्दीसाठी मार्गदर्शन करण्याच्या कामाला सुरुवात केली. एकदा का या विद्यार्थ्यांनी संधी किंवा कारकिर्दीचे लक्ष्य निश्चित केले, की त्यांना मदत करण्यासाठी म्हणून फ्युएल त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहचविण्याचे आणि त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रिया, प्रवेश अर्ज, प्रवेश परीक्षा, शिष्यावृत्तीसाठी सर्व मदत करण्याचे काम करते, त्याचबरोबर त्यांची एक २४ तास हेल्पलाईन आहे, जी वैयक्तिक मार्गदर्शन आणि अगदी मुलभूत कौशल्यांचे प्रशिक्षण देते. शैक्षणिक क्षेत्रापासून ते व्यावसायिक क्षेत्रापर्यंत, फ्युएल विद्यार्थ्याला सतत मदत करत असते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सेवा परवडू शकत नाहीत. त्यामुळे शाळांकडून शुल्क आकारले जाते. फ्युएलच्या एकूण कमाईपैकी वीस टक्के रक्कम यातूनच उभारली जाते. तर उर्वरीत ८० टक्के निधी हा सरकार, वैयक्तिक अनुदान आणि सीएसआरच्या माध्यमातून उभारला जातो, त्यातही सीएसआर चा वाटा सत्तर टक्के एवढा मोठा असतो. फ्युएल आपल्या प्रायोजक/भागीदारांबरोबर त्या त्या भौगोलिक प्रदेशात प्रशिक्षण किंवा सल्ला मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित एक करार करते.

त्याचबरोबर संस्था दोन मासिकेही काढते – स्टुडंटस् फ्युएल आणि आंत्रप्रुनर्स फ्युएल. यापैकी पहिल्या मासिकातून विद्यार्थ्यांना कारकिर्दीचे पर्याय, शिष्यावृत्ती, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि संबंधित माहितीविषयी मार्गदर्शन केले जाते. यामध्ये नाविन्यपूर्ण कारकिर्दींविषयी माहिती आणि कल चाचण्यांची तयारी, प्रवेश प्रक्रियांसाठी साहित्य, केस स्टडीज आणि वेगवेगळ्या व्यवसायातील नोकऱ्यांविषयीच्या माहितीचा समावेश असतो.
तर दुसरे मासिक हे तरुण उद्योजक, इनोव्हेटर्स आणि सामाजिक बदलांसाठी काम करणाऱ्यांसाठी आहे, जे समाजावर काहीतरी प्रभाव पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, अशांना यामधून निधी उभारणी, मार्गदर्शन, भागीदार, इत्यादीविषयी माहिती देण्यात येते.
सहयोग आणि प्रभाव
२०१४ मध्ये फ्युएलला एनएसडीसी (नॅशनल स्कील डेवलपमेंट कोर्पोरेशन) स्कील इनोव्हेशन चॅलेंज पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर दरवर्षी होणाऱ्या ऍक्शन फॉर इंडीया (एएफआय) समिटमध्येही त्यांचा सहभाग असतो. अधिक परिणाम साधण्यासाठी म्हणून फ्युएलने विविध संस्थांबरोबर सहयोग केला आहे, ज्यामध्ये देशपांडे फाऊंडेशन, एक सोच सॅंडबॉक्स, अशोका फाऊंडेशन, स्वदेस फाऊंडेशन, द ग्लोबल एज्युकेशन, इत्यादींचा समावेश आहे.

केतन पुढे सांगतात, “ प्रभावी लोक आणि सामाजिक उद्योजकांना जाणून घेण्यासाठी काही वेळ घालविणे हे गरजेचे असते. हेच लोक तुमच्या प्रगतीमध्ये मदत करतात, तुमचा वेळ वाचवितात आणि त्यांच्याबरोबरील अनुभवांच्या देवाणघेवाणीतून तुम्हाला समान आव्हानांना तोंड देता येते.”
फ्युएल सध्या देशातील अकरा राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि त्याचा परिणाम प्रचंड आहे. केतन सांगतात, की त्यांनी आजपर्यंत २७०० शाळा आणि महाविद्यालयातील ८,८०,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी ४८ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. शाळा न सोडण्याच्या त्यांच्या कार्यक्रमासाठी सत्तर टक्के विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रवेश परिक्षांसाठी अर्जदारांच्या संख्येत ३०-५० टक्के वाढ झाली आहे आणि नाकारलेल्या अर्जांची संख्या २८ टक्क्यांनी कमी झाली आहे.
तंत्रज्ञान, संसाधने आणि भांडवल यामुळे मर्यादा आल्या असल्याने, केतन यांच्या मते टीमची उभारणी, वाढ आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर ही सामाजिक उद्योजकांसमोरील महत्वाचे आव्हान आहेत. मात्र अनेक आव्हाने असतानाही, सर्व २९ राज्यांतील दुर्लक्षित समुदायांपर्यंत पोहचण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कठोर मेहनत करत आहेत.
या सारख्याच नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
लष्करात धाडसी कारकीर्द घडविणाऱ्या रिटायर्ड कॅप्टन तनुजा काबरे
विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'
दर्जेदार शिक्षणाच्या शोधात ‘मायक्लासरुम’!
लेखक – स्निग्धा सिन्हा
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन