क्रिएटिव्ह व्यक्तीच्या निर्मितीला मिळालेली दाद त्याला काम करण्यासाठी नवी ऊर्जा देते. किंबहुना जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी आणि आपल्या कामाचे मानसिक समाधान मिळविण्यासाठी ती त्याची गरज असते. दिप्ती कसबेकर या कॉपी रायटरच्या याच गरजेतून एक नवीन संकल्पना आकारास आली. २०१४ मध्ये पुण्यात सेनापती बापट रोडवर सुरु झालेले ‘दि मेश’ हे तिच्या याच संकल्पनेचे मूर्त रुप.

दिप्तीने सात वर्ष मुंबईमध्ये जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यात आपल्या आई-वडिलांकडे परतलेल्या दिप्तीने घरबसल्या कॉपीरायटींगची कामे करण्याचा निर्णय घेतला. काम सुद्धा चांगले मिळू लागले. मात्र वर्क फ्रॉम होम करताना एक मुख्य अडचण तिला जाणवली ती एकटेपणाची. सात वर्ष ऑफीसमध्ये बसून काम करताना लिहिलेली प्रत्येक गोष्ट सहकाऱ्यांना वाचून दाखवायची, त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आणि मग पुन्हा लिहायला सुरुवात करायची अशी सवय झालेल्या दिप्तीला लिहिलेले वाचून दाखवायला, त्यावर प्रतिक्रिया द्यायला कुणीच बाजूला नसणे खटकू लागले. त्यातच वर्क फ्रॉम होम म्हणजे २४ तास माणूस उपलब्ध असा घरच्यांचा आणि मित्र-मैत्रीणींचा दृष्टीकोन.. कधीही कुणीही यावे आणि गप्पा मारत बसावे. त्यातच कुकरची शिटी, दारावरची बेल यांचे व्यत्यय असायचेच. या सगळ्यामध्ये कामाप्रतीचा व्यावसायिक दृष्टीकोन, शिस्त कुठेतरी कमी पडतेय असे तिला वाटू लागले. अशातच ती कामाच्या निमित्ताने बंगळुरुला गेली. तिथे तीन दिवस एका हबमध्ये बसून काम करताना अनुभवलेल्या वातावरणातून को-वर्किंग प्लेसची कल्पना तिला सुचली. “तिथे काम करताना खूप छान वाटले. तिथे वेगवेगळ्या उपक्रमांवर काम करणारे दोन-तीन जण भेटले. विचारांची, कल्पनांची देवाण-घेवाण करता आली. ते तीन दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले,” असं दिप्ती सांगते.
पुण्यातले सर्वात पहिले को-वर्किंग प्लेस असलेल्या ‘दि मेश’मध्ये येणाऱ्या स्टार्टअप आणि उद्योजकांना ऑफीसमधील शिस्त, कॉफी शॉपची मजा आणि घरातला कम्फर्ट एका छताखाली अनुभवायला मिळावा याची खास खबरदारी घेतली गेली आहे. इथे येणाऱ्या सदस्यांना त्यांनी भरलेल्या फी मध्येच हाय स्पीड इंटरनेट, चहा-कॉफी, स्नॅक्स, महिन्याला २५ प्रिंटआऊट्स आणि एक ऑफीस असिस्टंट देण्यात येतो. विशेष म्हणजे माफक किंमतीत मेश या सुविधा पुरवते. “पैसे कमवण्यापेक्षा खेळीमेळीच्या वातावरणात, वेगवेगळ्या उद्योजकांच्या परस्पर सहकार्यातून आनंदी आणि काम करण्यास पूरक वातावरण निर्माण करणे हा दि मेशचा उद्देश आहे,” असं दिप्ती सांगते.

इथले वातावरण तणावरहित असावे म्हणून मेशचा एक अनोखा प्रयत्न म्हणजे इथे असणारे पाळीव प्राणी... दिप्तीला कुत्रा हा प्राणी खूप प्रिय. “त्यांच्यामुळे तणाव दूर व्हायला मदत होते म्हणून आम्ही मेशमध्ये ही संकल्पना राबविली. किंबहुना खास त्यासाठी मी एक कुत्रा पाळला,” असं दिप्ती सांगते. इतकंच नाही तर आठवड्यातले ठराविक दिवस इथे स्वतःचे पाळीव प्राणी सोबत आणण्याचीही मुभा देण्यात आली आहे. करिअरिस्टीक मॉमचा विचार करुन मेशमध्ये पाळणाघराची सुविधाही पुरविण्यात आली आहे. तसेच मुलांसाठी खूप सारी खेळणीही ठेवण्यात आली आहेत. इथे येणाऱ्या सदस्यांना कामासाठी पूरक वातावरण पुरविण्याबरोबरच त्यांच्या मानसिक आणि शारिरिक स्वास्थाची काळजीही इथे घेतली जाते. याकरिता उद्योजकांसाठी उपयुक्त चर्चासत्र, मनोरंजनात्मक कार्यक्रम, बेकरी क्लास इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच सदस्यांच्या शारिरीक स्वास्थासाठी जीमची सुविधाही पुरविण्यात आली आहे.
२०१४मध्ये पुण्यात सेनापती बापट रोडवर ‘दि मेश’चे पहिले को-वर्किंग प्लेस सुरु झाले आणि थोडेच दिवसात मेशला चांगला प्रतिसाद मिळू लागला. सुरुवातीला १२०० स्क्वे. फूटमध्ये सुरु करण्यात आलेल्या या को-वर्किंग प्लेसचा २७०० स्क्वे. फूटमध्ये विस्तार करण्यात आला. इथे ५० जणांसाठी वर्किंग डेस्क उपलब्ध आहे. ‘दि मेश’ ही संकल्पना पुणेकर उद्योजकांना एवढी रुचली की मेशला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत गेला आणि वर्षभरातच ‘दि मेश’चे कार्यक्षेत्रही विस्तारले. एसबी रोड पाठोपाठ बाणेर येथे ३० जागांच्या क्षमतेचे आणि कोरेगाव पार्क येथे २५ जागांचे को-वर्किंग प्लेस सुरु करण्यात आले. केवळ पुणेच नाही तर आता मुंबईतही ‘दि मेश’ने आपले पाय रोवले आहेत. मुंबईत चर्चगेट येथे १० जागांची क्षमता असलेले ‘मेश मिनी’ सुरु करण्यात आले आहे. “मुंबईतही चांगला प्रतिसाद आहे. मात्र इथे मेशमध्ये येणाऱ्यांमध्ये उद्योजकांपेक्षा कन्सल्टंट, वकिल, आर्टिस्ट आदि प्रोफेशनल्सची संख्या जास्त आहे,”असं दिप्ती सांगते.

सोशल मिडिया क्षेत्रातला अनुभव गाठीशी असलेले ‘दि मेश’चे सीओओ कौशिक भागवत यांच्या पुढाकाराने विडरशीन्स ही इनहाऊस मिडिया एजन्सी सुरु करण्यात आली आहे. यामार्फत येणाऱ्या काही दिवसांमध्ये ‘दि मेश’ सदस्यांसाठी सोशल मिडिया सर्विसही सुरु करणार आहे. “सुरुवातीच्या एक महिन्यासाठी सदस्यांना ही सुविधा मोफत देण्यात येईल,” असं कौशिक भागवत सांगतात. या सुविधेमुळे उद्योजकांना ऑनलाईन प्रेझेन्स मिळून जगभरात आपले उत्पादन पोहचविण्यास मदत होईल. दिप्तीच्या गरजेतून उदयास आलेली ‘दि मेश’ची संकल्पना आज अनेकांची काम करताना लागणाऱ्या पोषक वातावरणाची गरज भागवते आहे.