अभिनयाची पार्श्वभूमी, कोणताही गॉडफादर नसताना फॅन्ड्री सिनेमातून तो प्रकाशझोतात आला. नॅशनल अॅवार्ड विनर म्हणून गौरविला गेला. ‘अपघाताने अभिनय क्षेत्रात आलो तरी यातच करीअर करेन पण आधी अभ्यासाला प्राधान्य देईन', असे तो सांगतो. तो म्हणजे फॅन्ड्रीतला ‘जब्या’ म्हणजेच सोलापूरचा सोमनाथ अवघडे. अबोल, लाजराबुजरा असलेल्या जब्याचे आयुष्यच सोलापूरातील करमाळा तालूक्यातील. केम हे सोमनाथच गाव..गावापासून २५ कि.मी असलेल्या करमाळा येथील वाय.सी.एम महाविद्यालयातून त्याने अकरावीची परीक्षा दिलीयं. 'चित्रपटाच्या आॅफर येतात, अधून मधून चित्रीकरणालाही वेळ देतो पण चित्रपट कोणता ? कसलं काम़ ? सारं काही गुलदस्त्याच असू दे' असं तो सांगतो. सध्या त्याची बारावीची तयारी सुरु झाली आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं म्हणून आधी अभ्यास पूर्ण करायचा हे त्याच्या मनात फिट्ट झालयं. बी.कॉम पर्यंतच शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला पूर्णवेळ अभिनयासाठी देता येणार आहे. छोट्या मोठ्या कार्यक्रमात, स्वागतासाठी हलगी वाजवायचो, लोक थोडे फार पैसे टेकवायचे.आज लहान वयात अनेक कार्यक्रमांचं प्रमुख पाहूणे म्हणून आमंत्रण मिळतं. गावच्या इतर मुलांप्रमाणे आयुष्यात काय करायचं हे ठरलं नव्हतं पण सिनेमाने पूर्ण आयुष्य बदलून टाकलं.

जब्या म्हणून जगभरात त्याची हवा असली तरी मित्रमंडळींमध्ये तो सोम्या म्हणूनच ओळखला जातो. लोक येता जाता जब्या नावाने हाक मारतात पण हे जब्या नाव आपल्याला लय आवडतं असं तो सांगतो. एका हलगी वाजविणाया सोम्याला जब्या नावाने जगभरात ओळख मिळाली. आपला अभिनय लोकांच्या आठवणीत आहे. यापेक्षा दुसरा आनंद तो काय? त्यामुळे लोकांनी जब्या म्हटलं तर आपलं कौतुक होतय असं त्याला मनापासून वाटतं. आई-बाबा, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे. घरातला मंडळीचा आनंद अबोल पण अवर्णनीय असा आहे. जास्त शिक्षण नसल्याने त्यांना त्यांचा आनंद व्यक्त करता येत नसेल पण त्यांच्या आनंद त्यांच्या कृतीतून जाणवत असल्याचे तो सांगतो. सोमनाथच्या आईला सोमनाथबद्दल विचारले असता, सोमनाथची आई म्हणून सर्वजण चौकशी करतात, विचारपूस करतात याचा आनंद वाटत असल्याचे त्या सांगतात. नागराज सर हे आम्हाला देवाच्या स्थानी असल्याचेही त्या सांगतात. आज जे काही सोमाच्या आयुष्यात चांगलं घडतयं त्यामागे नागराज सरांचं मार्गदर्शन असल्याचे सोमनाथच्या आईने सांगितले.

आपला मुलगा काहीतरी भारी करतोय अस त्यांना वाटत असतं, चाहत्यांचा जब्या...मित्रांचा सोम्या..
मित्र, समाजातील नातेवाईकांमध्ये सोमनाथ यूथ आयकॉन बनलायं. मित्रांच्या गोतावळ्यात तो सोम्या म्हणूनच परिचयाचा आहे. लहानपणापासून एकत्र वेळ घालविलेल्या विकास, महादेव, रवी, शुभम हे ‘भाऊ कम मित्रा’सोबत घालवलेला वेळ कसा निघून जातो हे कळत नसल्याचे तो सांगतो. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या छोट्यामोठ्या कामांसाठी सोमा त्याच्या ओळखीने मित्रमंडळींनाही पाठवत असतो.
..जेव्हा रितेश देशमुख आॅटोग्राफ मागतो..
फॅन्ड्रीनंतर दोन वर्षाच्या काळात खूप खूप लोकांनी येऊन कौतूक केलं. अनेक दिग्गजांनी सल्ला, मार्गदर्शन केलं. पण रितेश देशमुख यांच्यासोबतची भेट सोमनाथच्या कायमची लक्षात राहणारी आहे. नॅशनल अॅवार्डच्या निमित्ताने रितेश सर भेटायला आले. त्यांनी माझं कौतूक तर केलंच पण माझी सही मागितली. हे सर्व क्षण न विसरता येण्यासारखे आहे, असे सोमनाथला वाटते. ज्यांना आपण सिनेमात मोठ्या पडद्यावर पाहतो अशी माणसं प्रत्यक्षात भेटून आपल्याशी बोलतात हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं असल्याचं त्याला आजही वाटतं.

नो गर्लफ्रेंड नो टेंशन...
प्रिय शालु, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दात सागता येणार नाही आणि माझ्यासारखं प्रेम तुझ्यावर कोणी करणार नाही.‘...फॅन्ड्री सिनेमातला हा सिन, संवाद कोणी सहसा विसरणार नाही. यात प्रेम आहे, निरागसता आहे,भावनिकता आणि कोवळ्या वयातला अल्लडपणा..सोमनाथच्या मित्रांच्या गप्पांमध्ये आजही त्या सिनची आठवण निघत असल्याचे तो सांगतो. चित्रपटात जब्या आणि शालूचं प्रेम समाजव्यवस्थेलाच मान्य नसलं तरी खऱ्या आयुष्यात कोणी शालू भेटली का हे विचारलं असता सध्या तरी अभ्यासाकडेच लक्ष देण्याचा विचार असल्याचे सांगत तो प्रश्न टाळतो. वॉट्सअॅपवरचा त्याचा ‘नो गर्ल फ्रेंड नो टेंशन हा स्टेटसही’ त्याचा पुरावा असल्याचे तो मिश्किलपणे सांगतो.
मंजूळे सरांचा आदर्श
सिनेमाच्या निमित्ताने मंजुळे सरांशी घरातल्या नातेवाईकाप्रमाणे नातं झालंय. आयुष्यात आणि करिअरमध्ये नागराज मंजूळे सरांचाच आदर्श घेतला आहे. त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी पण त्यांनी घेतली आहे. आज जी काही ओळख आहे, मानसन्मान आहे त्या सर्वाचे श्रेय नागराज सरांना जात असल्याचे तो सांगतो.