व्हीलचेअरवर बसून एका सैनिकी अधिकाऱ्याने पेलले ५०० मुलांचे भविष्य
घटना या घडत असतात, कसोटीचा क्षण कुणाच्या आयुष्यात येत नाही, पण अधिकतर लोक अशा क्षणामध्ये दुबळी पडतात. मात्र आपल्या समाजातले कॅप्टन नवीन गुलीया यांच्या सारखे लोक स्वतःच्या कतृत्वाने अशा क्षणावर धैर्याने मात करून उभे राहतात, आपले आयुष्य नव्याने जगण्याचा प्रयत्न करतात, त्यात नवीन रंग भरतात तसेच दुसऱ्याचे आयुष्य पण नव्या उमेदीने रंगीबेरंगी करण्याचा प्रयत्न करतात. कॅप्टन नवीन गुलीया भलेही स्वतःचा भार पेलू शकत नसतील पण व्हीलचेअरवर बसून त्यांनी आपल्या खांद्यावर अशा अनेक मुलांचा भार उचलला आहे की ज्यांना कुणीही नाही किंवा त्यांचे पालक इतके सक्षम नाही की जे त्यांना शिकवू शकतील, त्यांचे आयुष्य घडवू शकतील. कॅप्टन गुलीया यांनी आपली संस्था ‘अपनी दुनिया, आपण आशियाना’ तर्फे शेकडो मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललीच नाही, तर ते मुलांना प्रत्येक कामामध्ये सक्षम बनवित आहेत जे काम फक्त त्यांचे पालकच करू शकतात.

कॅप्टन गुलीया हे लहानपणापासूनच देशभक्त होते. याच एका ध्येयाने त्यांनी सैन्यात कॅप्टन कमांडोचे प्रशिक्षण घेतले. चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एका चढाओढीच्या दरम्यान उंचावरून पडल्यामुळे त्यांच्या पाठीला जबर दुखापत झाली. दोन वर्ष दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्यांना आर्मी सोडावी लागली. पण देशसेवेचा आवेश तसूभर पण कमी झाला नाही. ते सांगतात की, "आज मी गरीब व अपंग मुलांसाठी काम करतो म्हणून मला सन्मान देण्याची मुळीच गरज नाही. हे तर माझे समाज आणि देशाप्रती कर्तव्य आहे ". इतरांपेक्षा वेगळ्या विचारसरणीचे कॅप्टन गुलीया आणि त्यांची संस्था गरीब, भिक मागणारे तसेच वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची मुले यासारख्या सर्व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करीत आहे. ते मुलांच्या गरजेनुसार त्यांना मदत करतात. ते अशा मुलांचीपण मदत करतात की ज्यांना त्यांच्याच आईवडिलांनी स्वतःच्या परिस्थितीला कंटाळून सोडून दिले आहे. एकदा कडाक्याच्या थंडीत दाट धुक्यामध्ये त्यांना एका दोन वर्षाच्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, जिच्या अंगावर नाममात्र कपडे होते. जिला काही मुलांनी स्वतःबरोबर आणले होते व ती आजूबाजूला खेळत होती. तेव्हा कॅप्टन गुलीयांनी त्या मुलांना शोधून काढले व मुलीला एकटे सोडल्याबद्दल रागावले. ती मुले तिथून निघून गेल्यानंतर कॅप्टनने विचार केला की अशा मुलांची मदत केली पाहिजे आणि त्याच क्षणाला त्यांनी गरीब मुलांची देखभाल करण्याचा निश्चय केला.

आपल्या कामाची सुरुवात त्यांनी अशा मुलांपासून केली जे उपाशी आहेत. त्यांनी प्रथम अशा मुलांच्या अन्नाचा प्रश्न सोडवला. त्यानंतर त्यांनी अशा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली की ज्यांना अभ्यासात रुची आहे. मग अशा मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला तसेच त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्चपण केला. आजमितीला कॅप्टन गुलीया आणि त्यांची संस्था गुडगाव आणि आसपास राहणाऱ्या ५०० मुलांचे पालनपोषण करीत आहे.

हे कॅप्टन गुलीया यांच्या कठोर प्रयत्नांचे यश आहे. ते अशा गावांमध्ये जागृती अभियान चालवितात जिथे स्त्रियांची संख्या नगण्य आहे. याव्यतिरिक्त ते गावातल्या मुलींना बॉक्सिंगचे प्रशिक्षणपण देतात, फक्त आत्मसंरक्षणासाठीच नाही तर त्या खेळाच्या मैदानावर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील. या त्यांच्या प्रयत्नांनी व शिकवणीने आज काही मुली क्रीडाक्षेत्रात आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. याव्यतिरिक्त अशापण मुलांची मदत करतात जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या व उपचाराच्या गरजा सुद्धा भागविल्या जातात.

‘अपनी दुनिया, आपण आशियाना’ नामक संस्था गरीब व अशक्त मुलांसाठी वेळोवेळी मेडिकल कॅम्प, उपाशी मुलांसाठी जेवणाची सोय तसेच गरीब मुलांसाठी कपडे पुरविण्याचे काम करते. हरीयानाजवळ मानेसरमध्ये राहणारा एक मुलगा सनी याच्या शिक्षण व उपचार यासाठी ही संस्था मागील दहा वर्षापासून मदत करीत आहे. हा मुलगा दरवर्षी त्याच्या शाळेत प्रथम क्रमांकाने पास होतो तसेच या वर्षी दहावीच्या परीक्षेत त्याला ९५% गुण मिळाले आहेत. अशीच एक गीता नावाची मुलगी आहे की जिचे पोलिओमुळे शिक्षण अपूर्ण राहिले ती या संस्थेच्या मदतीमुळे शिक्षण पूर्ण करून आज एक शिक्षिकेची नोकरी करीत आहे व दुसऱ्या मुलांना शिकविण्याचे काम करीत आहे. ही संस्था अशा अनेक मुलांना मदत करते ज्यांचे वय ४ ते १४ वर्षापर्यंत आहे.

कॅप्टन गुलीया गरीब मुलांना मदत करण्याबरोबरच एक उत्तम लेखक पण आहेत. बाजारात त्यांची पुस्तके ‘वीर उसको जानीए ’ आणि ‘इन क्विस्ट ऑफ लास्ट व्हिक्टरी’ बरीच प्रसिद्ध आहेत. मनमौजी कॅप्टन गुलीया आज भलेही व्हीलचेअरवर बसले असले तरी त्यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. ते अॅडव्हेंचर ड्रायव्हिंग बरोबरच पॉवर हँडग्लायडर मध्ये पण माहीर आहेत.

आपल्या भावी योजनांबद्दल कॅप्टन गुलीया सांगतात की, " महात्मा गांधी म्हणायचे, समाजाची प्रगती त्या समाजातील अशक्त व्यक्तीकडे बघून कळते आणि आपल्या समाजात सगळ्यात अशक्त मुले आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणूनच मी अशा मुलांची जास्तीत जास्त मदत करू इच्छितो".
लेखक : हरीश बिश्त
अनुवाद : किरण ठाकरे