‘मतिमंद’ मुलांचे स्थान उंचाविणारे ‘आधार’
ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या अंगणी ढग झुकले, त्यांनी ओंजळीने पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय, त्यांनी रिते करून भरून घ्यावे आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडं खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना खांद्यावर घ्यावे........
मतिमंद मुलं वाढवणं, ही खरंच तारेवरची कसरत असते. या मुलांना वाढवताना समाजाच्या काहीशा उत्सुक आणि सहानुभूतिपूर्ण, तर क्वचित उपहासात्मक नजरांचा सामना करताना त्यांच्या पालकांची होणारी ओढाताण तर शब्दातीत असते. असं मूल का जन्माला आलं, याचं उत्तर कोणाकडंही नसतं. त्याचा स्वत:चा आणि त्याच्या आईवडिलांचा काहीही दोष नसताना त्यांना हे अग्निदिव्य पार पाडावं लागतं. या विशेष मुलांसाठी काहीतरी करावं, या उद्देशाने पाच विशेष मुलांसह 'शेल्टर होम' सुरू केलेल्या ‘आधार’ संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्यांच्या डोक्यावर सावली धरता धरता मतिमंद मुलांच्या पालकांची झोळी समाधानाने भरून गेली आहे.
भारतातील सर्वात पहिली विशेष मुलांची संस्था म्हणजे ‘आधार’ ! आपल्या पश्चात आपल्या मतिमंद मुलाची देखभाल कोण करणार? या काळजीतून अमेरिकेत एका वृद्ध आईने आपल्या मुलाची हत्या केली होती. ही बातमी वाचून मुंबईतल्या एका संस्थेच्या अपंग सेलचे प्रमुख असणार्या माधवराव गोरे यांनी अस्वस्थ होत १९९४ साली ही संस्था सुरू केली. त्यावेळी देशात मतिमंदांचा आजीवन सांभाळ करून त्यांची काळजी घेणारी कोणतीही संस्था नव्हती. मतिमंद मुलांच्या पालकांचा आधारच्या उभारणीत महत्वाचा वाटा होता. कारण विशेष मुलांच्या समस्यांची जाणीव आणि कल्पना त्यांना चांगल्याप्रकारे माहित होती. ‘आधार’ मधील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या चेहर्यावरील समाधान बरेच काही सांगून जाते.

मागील दोन दशकांपासून बदलापूरजवळ असलेल्या मूळगाव भागात ही संस्था कार्यरत आहे. या ठिकाणी मतिमंद मुलांच्या संगोपनासाठी शेल्टर होम उभारण्यात आले असून, येथे सध्या दोनशे मतिमंद मुलांचा सांभाळ केला जात आहे. पहिल्या वर्षी पाचवर असणारी मुलांची संख्या दुसर्या वर्षी थेट ५० वर गेली. गतिमंद मुले १८ वर्षाची होईपर्यंत त्यांचा सांभाळ करणे सोपे असते, मात्र त्यानंतर त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. अनेक पालकांना कामाच्या व्यापातून किंवा उतारवयामुळे हे शक्य होत नाही. त्यामुळे पालकांच्याच सहभागातून स्थापन झालेल्या संस्थेत १८ वर्षावरील मुलांचा आजीवन सांभाळ केला जातो. माधवराव गोरे यांचे पुत्र विश्वास गोरे हे सध्या या संस्थेची देखभाल करत असून, सध्या या संस्थेत फक्त भारतातीलच नव्हे; तर अमेरिका, दुबई अशा ठिकाणचीसुद्धा १८ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतची मुले, मुली वास्तव्यास आहेत. तर तीन पाळ्यांत काम करणारे सुमारे १६५ कर्मचारी त्यांचा उत्तमरीत्या सांभाळ करत आहेत. साडेसहा एकर पसरलेल्या संस्थेच्या या व्यापात पाच निवासी संकुले, कार्यशाळा, स्वयंपाकघर, मैदान आणि दवाखाना यांसारख्या सुविधा सध्या उपलब्ध आहेत.

या मुलांना शिकवताना कमालीचा संयम आवश्यक आहे. आज शिकवलेली गोष्ट अनेक दिवस शिकवावी लागते. प्रत्येकाचा बुध्यांक वेगवेगळा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिकवण्याचे मापदंड वेगवेगळे असतात. अशा वेळी शिकताना जितका या मुलांचा कस लागतो तितकाच किंबहुना त्याहुनही आधिक कस त्यांना शिकवणार्या शिक्षकांचा लागतो. मतिमंद मुलांना त्याहुनही तीव्र अपंगत्व असलेल्या मुलांना शिकवणं ही अवघड कामगिरी सावलीचे शिक्षक लीलया पेलतात. एखादे काम मनासारखे न झाल्यास किंवा त्यांना अटकाव केल्यास हायपर ऍक्टीव मुले दंगा करतात, रडतात, बोचकारतात. अशावेळी या मुलांना विश्वासात घेऊन, त्यांच्या मनातील भिती दुर करुन त्यांना आपलेसं करण्याचं आव्हान या शिक्षकांसमोर असतं. ‘वाळुचे कण रगडिता तेल ही गळे’ ही उक्ती ‘आधार’च्या शिक्षकांना चपखल बसते.
या संस्थेने मुलांच्या संगोपनासाठी लागणार्या दैनंदिन गरजा स्वत:च भागवण्याचा प्रयत्न केला असून, याच संकल्पनेतून या संस्थेला दररोज लागणारे सुमारे ५० लिटर दूध संस्थेच्या स्वत:च्या तबेल्यातून त्यांना उपलब्ध होते. तर गरम पाणी तयार करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. येथे पवनचक्कीही लावण्यात आली असून, त्याद्वारे निर्माण होणार्या विजेचा याच ठिकाणी वापर केला जातो. मुलांचे केस कापणे, दाढी करणे यासाठी आठवड्यातून दोनदा न्हावी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर येऊन मुलांची पाहणी करतात. संस्थेची स्वत:ची रुग्णवाहिकादेखील असून परिसरातले नामांकित डॉक्टर आपल्या मुलांना अगदी नि:स्वार्थी भावनेतून सेवा पुरवित असतात.
मतिमंद असूनही या मुलांना स्वावलंबी जीवनाचे धडे या ठिकाणी दिले जातात. मुलांचा केवळ सांभाळ न करता त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना कामे शिकवली जातात. हातमाग यंत्रावर टॉवेल, रूमाल तयार करणे, ग्रीटिंग कार्ड तयार करणे, मेणबत्त्या तयार करणे, कंदील, पणत्या तयार करणे अशी अनेक कामे या ठिकाणी मुलांकडून करून घेतली जातात. यातून तयार होणा-या वस्तू मुंबई-ठाण्यातल्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवून त्याद्वारे मिळणार्या उत्पन्नातून या मुलांच्या संगोपनाला हातभार लागतो. मुलांच्या कामातून मिळणारे हे उत्पन्न, पालक तसेच इतर देणगीदारांची देणगी यातूनच संस्थेचा पूर्ण कारभार चालतो. स्वकष्टार्जित कमाई मिळाल्यानं या मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास जागृत होताना दिसून येतो. आपणही कुणीतरी आहोत, काहीतरी करू शकतो, ही भावना त्यांना जगण्याचं बळ देते. आज तीव्र अपंगत्वामुळे ज्या मुलांना इतर शाळेत नाकारलं जातं त्या मुलांना ‘आधार’ ने आपल्या पंखा खाली घेऊन या मुलांना आणि पर्यायाने त्यांच्या पालकांना आशेचा किरण दाखवला आहे. आपल्या नंतर आपल्या मतिमंद पाल्याचं काय असे वाटणाऱ्या अनेक पालकांची काळजी ‘आधार’ नेे दुर केली आहे. जे आहे ते स्वीकारुन नविन काहीतरी निर्माण करण्याची जिद्द, उमेद आणि त्याच बरोबर आत्मविश्वास ‘आधार’ आज या मुलांमध्ये निर्माण करत आहे.

आजवरचा ‘आधार’चा प्रवास वैशिट्यपूर्ण असला तरी ‘आधार’ची वाट ही खडतर होती. परंतु रस्त्यात आलेल्या काट्यांना अलगद दुर करुन ‘आधार’ धडपडत, अडखळत मार्गक्रमण करत राहिले. आधार या संस्थेच्या अजोड कष्टाची दखल घेत या संस्थेला २००६ साली बेस्ट इन्स्टिट्यूशन अवॉर्ड व ३ डिसेंबर २०१४ रोजी बेस्ट असोसिएशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. अशा ध्येयवेड्या संस्थेला गरज आहे तुमच्या आमच्या मदतीची. आज ‘आधार’ मूळे या मुलांच्या डोळ्यात आंनद तर पालकांच्या डोळ्यात समाधान दिसते आहे.
कोण म्हणेल मतिमंद परि बोलके आमचे अंग अंग या ओळी सत्यात उतरवण्यासाठी ‘आधार’ अखंड पणे झटत आहे. आधार संस्था, बदलापूर.