अंध वाचकांसाठी उमेश जेरे आणि सहकाऱ्यांचे निरपेक्ष कार्य
‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण आहे. वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. मात्र यासाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच अवांतर वाचनही महत्त्वाचे असते. अवांतर वाचन करण्यासाठी वाचनाची सवय मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवायला लागते. अंध मुलांच्या बाबतीत मात्र ही सवय रुजवणे काही वर्षांपूर्वी कठीण काम होते. कारण अवांतर वाचनासाठीची पुस्तके ब्रेल लिपीमध्ये उपलब्धच नव्हती. मात्र उमेश जेरे यांच्या सामाजिक जाणीवेमुळे ही समस्या आता दूर झाली आहे.

बी.ई इलेक्ट्रीकल असलेले उमेश स्वतः एक व्यावसायिक आहेत. १९९३ पासून त्यांचा इण्डस्ट्रीअल ऑटोमेशनचा व्यवसाय आहे. २००६ साली त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांवर आजारपण ओढावले आणि त्यामुळे त्यांचा मानसिक ताण वाढत गेला. या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी काही तरी करायला पाहिजे असे जेरे दाम्पत्याला वाटले आणि समाजोपयोगी कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे त्यांनी ठरविले. “आम्ही काही वृद्धाश्रमांना भेट दिली, मतिमंद आणि अंधांच्या शाळांना भेट दिली. आमच्याकडे पैसा होता मात्र मला व्यवसायामुळे आणि संगीताला घरातील कामांमुळे संपूर्ण वेळ एखाद्या कामासाठी देणं शक्य नव्हतं. अंधांच्या शाळेत गेल्यावर आम्हाला समजलं की त्यांना लागणारी ब्रेल लिपीतील पुस्तकं कम्प्युटरवर टाईप करुन देण्याचं काम असतं. हे काम आम्हाला आमची कामं सांभाळून करता येण्यासारखं होतं. आम्ही ते करायचं ठरवलं,” उमेश सांगतात.
दरम्यान या दाम्पत्याने पुण्यात कोथरुडमध्ये असलेल्या ‘गांधी भवन’ या अंधांच्या शाळेला भेट दिली. त्यावेळी तिथल्या मुख्याध्यापिकांनी त्यांना अंधांसाठी अवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध नसल्याबद्दल सांगितले. “आजवर जी पुस्तकं ब्रेलमध्ये तयार झाली ती एकतर पाठ्यपुस्तकं आहेत नाहीतर उपदेशात्मक पुस्तकं. चांदोबा, जादूचा शंख, परी यासारखी पुस्तकंही अंध मुलांना वाचायला मिळायला पाहिजेत असं त्या म्हणाल्या. त्यांनी अशी पुस्तकं जमा करुन ठेवली होती. ती त्यांनी आम्हाला दिली आणि अवांतर वाचनाची पुस्तकं ब्रेलमध्ये तयार करुन ती अंधशाळांना उपलब्ध करुन द्यायचं काम करायचं हे आमचं निश्चित झालं.”

ब्रेलमध्ये पुस्तक तयार करण्यासाठी उमेश यांना आधी ब्रेल लिपी शिकावी लागणार होती. त्यांनी ती शिकायला सुरुवातही केली. मात्र त्यांना जाणवले की ही लिपी शिकणे अवघड आहे. “माझ्या मनात आलं की ही लिपी शिकण्यातच आपलं एक वर्ष जाईल आणि त्यानंतर कोण जाणे आपल्याकडे हे काम करायला वेळ असेल की नाही. म्हणून मग यावर उपाय म्हणून मी स्वतःच एक सॉफ्टवेअर तयार केलं. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही टाईप करत असलेला मजकूर तुम्हाला मराठीत दिसतो आणि ब्रेलमध्ये रुपांतरित होतो. ब्रेलचे नियम पाळून काम केलं तर जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुस्तकं ब्रेलमध्ये तयार करायची, त्याची सॉफ्ट कॉपी शाळेत द्यायची आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची असा कार्यक्रम जवळपास सहा महिने सुरु होता,” उमेश सांगतात.

उमेश जेरे पत्नी संगीता जेरे यांच्यासह
एक दिवस शाळेच्या मुख्याध्यापिकांनी उमेश यांना भेटून आश्चर्य व्यक्त केले. “त्या म्हणाल्या की तुम्ही ब्रेल शिकायला आला नव्हता. मात्र तरीही तुम्ही ब्रेलमध्ये पुस्तकं तयार करुन देत आहात आणि यामध्ये चुकाही कमी आहेत. हे कसं काय? तेव्हा मी त्यांना सॉफ्टवेअरबाबत सांगितलं. ते ऐकून त्यांनी मला प्रश्न केला की हे सॉफ्टवेअर ब्रेलमधून पुस्तकं तयार करणाऱ्या इतर सामाजिक कार्यकर्त्यांना देता येईल का? कारण ब्रेल शिकवणाऱ्या शिक्षकांना सामाजिक कार्यकर्त्यांना शिकवण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. मला काही सॉफ्टवेअर विकून पैसे कमवायचे नव्हते. त्यामुळे मी त्यांना लागलीच होकार दिला आणि इतर कार्यकर्त्यांकडे जाऊन हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी तयार केलेल्या पुस्तकांचं प्रुफ रिडिंग करुन देऊ लागलो. अशी जवळपास २०० -२५० पुस्तकं केली. यामुळे माझ्याप्रमाणेच ब्रेल साहित्यासाठी काम करणाऱ्या पुण्यातल्या २५-३० जणांशी मी जोडलो गेलो,” उमेश सांगतात.
ते पुढे सांगतात, “पुण्यात चार अंधशाळा आहेत. त्यावेळी प्रत्येकजण केवळ स्वतःच्या संस्थेपुरतं काम करत होतं. एखाद्या संस्थेकरिता तयार झालेलं ब्रेल लिपीतलं पुस्तक केवळ त्या संस्थेकडेच रहायचं. हे बदलायला पाहिजे, प्रत्येक पुस्तक सगळ्यांना वाचायला मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायचं ठरवलं.”
उमेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकार आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जवळपास १५० ते २०० अंधशाळांची नावं आणि पत्ते मिळविले. त्यानंतर प्रत्येक शाळेत पत्र पाठवून त्या शाळेत कितवी पर्यंतचे वर्ग आहेत, एकूण किती मुलं आहेत याबाबत विचारणा केली. जेणेकरुन कुठल्या पद्धतीची पुस्तकं पुरवायची, किती पुस्तकं पुरवायची याचा अंदाज यावा. “आम्ही जवळपास १७५ पत्र पाठवली. त्यापैकी ५० शाळांमधून उत्तरादाखल पत्र आलं. यामध्ये अनेक खेड्यातल्या आणि छोट्या शहरांमधल्या शाळाही होत्या. पुण्या-मुंबईच्या शाळांची परिस्थिती चांगली असते. मात्र खेड्यातील किंवा छोट्या शहरांमधील शाळांना पुस्तकं मोफत उपलब्ध करवून द्यावी लागणार होती. पुस्तकं मोफत द्यायची तर छापायची कशी आणि कुठे, संस्था रजिस्टर न करता पैशाचे व्यवहार कसे करायचे असे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे राहिले,” उमेश सांगतात.

या प्रश्नांवर उमेश आणि सहकाऱ्यांना ‘नॅब’ हे उत्तर सापडले. ‘नॅब’ म्हणजेच ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’. ही संस्था मुंबईत वरळीमध्ये कार्यरत आहे. “महाराष्ट्रातील सर्व अंधशाळांना ‘नॅब’ पाठ्यपुस्तकं पुरवते. त्यामुळे त्यांचा छापखाना मोठा आहे. दर दिवशी २५ हजार पानं छापण्याची त्यांची क्षमता आहे. त्यांनी आमच्यासाठी छपाईचा दरही कमी लावला. त्यांना प्रत्येक पानासाठी ८० पैसे द्यायचं ठरलं. त्याचबरोबर छपाईकरिता येणारा खर्च हा आम्ही ‘नॅब’ला देणगीस्वरुपात द्यायचा आणि ‘नॅब’ त्याची आम्हाला रितसर पावती देणार, आम्ही या पावत्या देणगीदारांना देऊन त्यांचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेल्याची हमी देणार असं ठरलं. यामुळे आमचा आर्थिक व्यवहाराबाबतचा प्रश्नही सुटला,” उमेश सांगतात.
ब्रेल लिपीतील पुस्तकांना पोस्टल चार्जेस लागत नाहीत. मात्र पॅकेजिंगचा प्रश्न शिल्लक होताच. “बॉक्स मॅन्युफॅक्चर्सना आमच्या कामाबाबत समजल्यावर त्यांनी बॉक्स फ्री देण्याची तयारी दाखविली. मग मुंबईहून पुस्तकं आणायची आणि पुण्यात पॅक करुन शाळांना पाठवायची असा सिलसिला सुरु झाला. जसजसे मार्ग निघत होते आमचा हुरुप वाढत होता. मग आम्ही मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करायचा आणि २०० ते २५० पुस्तकं शाळांना पाठवायची असं ठरवलं. आपापल्या ओळखीमध्ये, मित्रांना सांगून पैसे जमा केले. ५०० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत देणग्या आल्या. बघता बघता एकूण सहा लाख रुपये जमले. यामधून साडे बारा हजार पुस्तकं तयार झाली,” असं उमेश सांगतात.

सुखदा पंतबाळेकुंद्री
२००८-०९च्या दरम्यान उमेश यांची ओळख मुंबईत ब्रेल साहित्यासंदर्भात काम करणाऱ्या सुखदा पंतबाळेकुंद्री यांच्याशी झाली. ज्यांना ब्रेल शिकण्यात रस आहे अशांना ब्रेल लिपी शिकवून त्यांच्याकडून पुस्तक तयार करुन घेण्याचे काम सुखदा मुंबईमध्ये करत होत्या. “सुखदा यांच्याबरोबर झालेल्या ओळखीमुळे पुण्याबरोबरच मुंबईतील कार्यकर्त्यांचाही एक ग्रुप तयार झाला. त्यानंतर आम्ही लहान मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांसाठी पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये तयार करायचं ठरवलं. पु.ल, व.पु. यांची काही पुस्तकं ब्रेलमध्ये असली तरी ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. म्हणूनच अशी पुस्तकं तयार करुन ती कॉलेज लायब्ररी, शासकीय ग्रंथालय अशा मोठमोठ्या ग्रंथालयांना विकायची असं ठरवलं. याचाही व्यवहार ग्रंथालय आणि ‘नॅब’मध्ये परस्पर होईल असं ठरलं. या प्रोजेक्टसाठी केवळ पुण्या-मुंबईतूनच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणांहून लोक काम करत आहेत. जवळपास ३००-३५० लोकांचा ग्रुप यासाठी काम करत आहे. विशेष म्हणजे यापैकी एकही व्यक्ती या कामाचे पैसे घेत नाही. या ३००-३५० लोकांमध्ये समन्वय राखणं, एखादं पुस्तक एकाच वेळी दोघांनी किंवा अनेकांनी ब्रेलमध्ये तयार करु नये याची काळजी घेणं, तयार झालेल्या पुस्तकांचं प्रुफ रिडींग करणं, मुळ लेखकांची परवानगी घेणं इत्यादी जबाबदाऱ्या सुखदा सांभाळतात. आतापर्यंत मोठ्या माणसांसाठी जवळपास ९० पुस्तकांचं काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रात १२ग्रंथालयांमध्ये ब्रेल साहित्याचा वेगळा विभाग सुरु करण्यात आला आहे. तिथे ही पुस्तकं उपलब्ध आहेत,” असं उमेश सांगतात.
छोट्यांच्या आणि मोठ्यांच्या अवांतर वाचनाच्या मराठी पुस्तकांपाठोपाठ उमेश आणि सहकाऱ्यांनी अंधशाळांना ब्रेल लिपीतील इंग्रजी पुस्तकं पुरविण्याचा उपक्रम हाती घेतला. “व्यावहारिक आयुष्य जगताना इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची गरज लक्षात घेऊन शाळांनी आमच्याकडे इंग्रजी पुस्तकांची मागणी केली. मग ७० पुस्तकांचा सेट प्रत्येक शाळेला पाठवायचा असं ठरलं. यामध्ये सातवी पर्यंत वर्ग असलेल्या शाळांमध्ये ५० लहान मुलांसाठीची आणि २० मोठ्या मुलांना वाचण्याजोगी पुस्तकं पठविली. या प्रोजेक्टसाठी ६ - ६.५ लाख खर्च आला. हा संपूर्ण खर्च एमएमसी हार्डमेटल या कंपनीने आपल्या सीएसआर ऍक्टीव्हीटीअंतर्गत केला. आम्ही ‘नॅब’कडून मिळालेली पावती कंपनीला पाठवली. हे प्रोजेक्ट या महिन्यात पूर्ण झालं,” असं उमेश सांगतात.

ब्रेल लिपीत साहित्य रुपांतरित करण्याबरोबरच www.blindbooks.in या वेबसाईटच्या माध्यमातून जगभरात चालणाऱ्या ब्रेलमधील कामामध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्नही उमेश आणि सहकारी करत आहेत. “जगभरात अनेक स्वयंसेवी संस्था, अनेक माणसं ब्रेलमध्ये साहित्य रुपांतरित करत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाच्या अभावामुळे अनेकांची मेहनत वाया जाते. एकच पुस्तक अनेक जण तयार करतात. मनाचे श्लोक आतापर्यंत २५ जणांनी ब्रेलमध्ये रुपांतरित केले आहेत. म्हणूनच ही वेबसाईट तयार केली. या वेबसाईटवर प्रत्येक पुस्तक कोण तयार करत आहे त्याची नाव पत्त्यासकट माहिती दिली जाते. जेणेकरुन ज्याचे श्रेय त्याला मिळते आणि आर्थिक व्यवहारही ज्याचे तो बघतो,” उमेश सांगतात.
या कामात सुव्यवस्थितपणा येण्यासाठी सरकारनेही यामध्ये लक्ष घालावे, ग्रंथालयांमध्ये ब्रेल साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत नियम लागू करावे अशी अपेक्षा उमेश व्यक्त करतात. तसेच अंध विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळावीत, मार्गदर्शक ब्रेलमधून उपलब्ध व्हावे, ब्रेलमधून तयार होणारी पुस्तके कुठे उपलब्ध आहेत याची माहिती मुलांना सहजरित्या मिळावी यासाठी व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न करत असल्याचेही ते सांगतात. तसेच भविष्यात मराठी प्रमाणेच इतरही प्रादेशिक भाषांमधून ब्रेल साहित्य उपलब्ध करुन देण्याची त्यांची योजना आहे. “यासाठी आता मी हळूहळू माझ्याकडच्या जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोपवून महाराष्ट्रातील कामामधून बाहेर पडू लागलो आहे. यानंतर गुजराती भाषेत मराठीप्रमाणे काम करायचे आहे. माझ्या पत्नीला गुजरातीचे ज्ञान असल्यामुळे या भाषेपासून कामाला सुरुवात करणार आहोत. या कामामधून इतर प्रादेशिक भाषांसाठी काम करताना काय अडचणी येऊ शकतात याचाही आम्हाला अंदाज येईल. महाराष्ट्रातील कामाची जबाबदारी हळूहळू इतरांवर सोपविण्यामागे आणखी एक कारण आहे. हे काम केवळ माझ्यावर अवलंबून राहू नये असे मला वाटते. उद्या कुठल्याही कारणाने मी हे काम करण्यास असमर्थ ठरलो तरी हे काम थांबता कामा नये,” अशी इच्छा उमेश व्यक्त करतात.

ते पुढे सांगतात, “ या प्रवासात भेटलेल्या प्रत्येकाने या कामामध्ये आम्हाला चांगली साथ दिली. मौज आणि इंद्रायणी प्रकाशनने सॉफ्ट कॉपीमध्ये पुस्तकं उपलब्ध करुन देऊन आमची मेहनत वाचवली. लेखक, कवींनीही त्यांचे साहित्य रुपांतरित करण्यासाठी आपणहून परवानगी दिली.” उमेश आणि सुखदा यांना त्यांच्या कामासाठी २०१४ साली पार्ल्यातल्या लोकमान्य ग्रंथालयाने ‘गोपाळ गणेश आगरकर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
दुनियेचे रंग कधीही प्रत्यक्ष पाहू न शकणाऱ्या अंधांना पुस्तकांच्या माध्यमातून जगाची ओळख होते. हे ज्ञान त्यांना त्यांच्या अंधःकारमय आयुष्यात मार्गदर्शक ठरते, त्यांचा आत्मविश्वास वाढवते. उमेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निरपेक्ष समाजसेवेमुळे अवांतर वाचनापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या एका मोठ्या हिश्श्याला आज ज्ञान समृद्धी लाभली आहे.