आता महाराष्ट्रातही किफायतशीर कॅब सेवा, विविगो कॅब सेवेला पुण्यात सुरवात
पुणे किंवा मुंबई शहरात फिरण्यासाठी अनेक खाजगी कॅब सेवा उपलब्ध आहेत. तसंच पुण्यातून मुंबईत जाण्यासाठी आणि मुंबईतून पुण्यात येण्यासाठी पण कॅब सेवा आहेत. पण या कॅब चा उपयोग एक वेळच्या प्रवासासाठी म्हणजे फक्त पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी केला तरी दोन वेळचे म्हणजे जाण्याचे आणि येण्याचे असे भाडे द्यावे लागते. कोणत्याही कॅब चे साधारण ४ हजार रुपये इतके भाडे आकारले जाते. त्यामुळे हा प्रवास काहीसा महाग पडतो. महाराष्ट्रातील इतर शहरात जाण्यासाठी खात्रीशीर कॅब सेवा उपलब्ध नव्हती.
पुणे मुंबई तसंच पुणे नासिक, पुणे औरंगाबाद आणि पुणे गोवा या मार्गासाठी आता एक कॅब सेवेचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे विविगो कॅब सेवा. गुरुवार १८ फेब्रुवारी पासून पुण्यामध्ये या कॅब सेवेला अधिकृत सुरवात झाली अशी माहिती विविगो चे संस्थापक आणि सीई एम ओ निलेश पावसकर यांनी दिली.

पुण्याहून मुंबईत जाण्यासाठी आज अनेक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. शासकीय आणि खाजगी बस सेवा, रेल्वे, विमान सेवा शिवाय कॅब सेवा पण काहीवेळा या सेवांचा लाभ घेताना खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. पुण्यातून मुंबईत जाण्यासाठी राज्यातील इतर शहरांमध्ये जाण्यासाठी कॅब सेवेला मोठी मागणी आहे. पण किफायतशीर दरात आणि खात्रीशीर अशी कॅब सेवा उपलब्ध नाही. या कॅब सेवेला आता विविगो कॅब हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.
विविगो कॅब सेवा वेबसाईट च्या माध्यमातून सध्या उपलब्ध आहे. विविगो च्या संकेतस्थळावरून तुम्ही जर तातडीचं कॅब बुकिंग केलं तर साधारण अर्ध्या तासात तुम्हाला कॅब उपलब्ध होते. तसंच कॅब तुमच्या दारात येते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक वेळच्या प्रवासासाठी जर कॅब मागवली असली तर एकाच प्रवासाचे भाडे आकारले जाते. म्हणजे पुणे ते मुंबई एकवेळच्या प्रवासाचे म्हणजे फक्त जाण्याचे किंवा फक्त येण्याचे ४ हजार रुपये द्यावे लागतात. पण तेच विविगो कॅब ला एकाच प्रवासाचे भाडे द्यावे लागते, ते साधारण १८९९ रुपये इतके आहे. म्हणजे पुणे ते मुंबई प्रवास विविगो कॅबने केल्यास तुम्हाला निम्मेच भाडे द्यावे लागते.

विविगो कॅब ने इतर शहरात प्रवास करण्यासाठी याच पद्धतीने भाडे आकारले जाते. पुण्यातून नाशिक, औरंगाबाद आणि गोवा या शहरांत जाण्यासाठी विविगो कॅब सेवा हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या विविगो कॅब सेवेत सेडन आणि एस यु व्ही या प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत.
विविगो कॅब सेवा एप्रिल २०१५ मध्ये दिल्ली मध्ये सुरु करण्यात आली. निलेश पावसकर आणि सुनील चावला हे विविगो चे संस्थापक असून त्यांनी दिल्ली ते चंदीगड या मार्गावर पहिल्यांदा ही कॅब सेवा सुरु केली. शहरातल्या शहरात फिरण्यासाठी अनेक कॅब सेवा उपलब्ध आहेत. पण दोन शहरांना जोडणारी दर्जेदार आणि किफायतशीर कॅब सेवा असावी या कल्पनेतून विविगो कॅब सेवेला सुरुवात झाली. दिल्ली ते चंदीगड या मार्गावर या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर पुणे ते मुंबई या मार्गावरील उपयुक्तता लक्षात घेऊन या मार्गावर ही सेवा सुरु करण्यात आली. तसंच राज्यातील इतर शहरंही कॅब सेवेने जोडली जावीत या उद्धेशाने इतर शहरातही ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
पुणे ते गोवा या मार्गावर या कॅब सेवेला भरपूर मागणी आहे. देशातील शहरांमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GDP खर्च करणारं पुणे हे सहाव्या क्रमांकाचं शहर आहे. त्यामुळे या दोन शहरांमध्ये सेवा सुरु करण्यास प्राधान्य दिल्याचं पावसकर सांगतात.
पुणे, मुंबई, गोवा, नाशिक औरंगाबाद, दिल्ली आणि चंडीगड या शहरांसह ४९ शहरात विविगो कॅब सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. सध्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविगो सेवा उपलब्ध असून, दर महिन्याला २५०० फेऱ्या किंवा ट्रिप्सची पूर्तता विविगोच्या माध्यमातून केली जाते. विविगोशी सध्या ७०० वाहन मालक सलग्न झाले असून सुमारे सहा हजार गाड्या त्यांचाकडे उपलब्ध आहेत. तर दर महिन्याला सुमारे ५५ हजार नवीन ग्राहक विविगोच्या संकेतस्थळाला भेट देतात.

सुरवातीच्या काळात एक मिलिअन अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक विविगोमध्ये झाली असून, एप्रिल २०१६ नंतर ३ ते ५ अमेरिकी डॉलर इतकी गुंतवणूक स्वीकारण्यात येणार असल्याचं संस्थापक निलेश पावसकर सांगतात.
खाजगी कॅब म्हटलं की सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो किंवा बरेचदा कॅब चालक हे ग्राहकांशी उद्धटपणे वागतात. या गोष्टी टाळण्यासाठी ज्या वाहन चालकांना सेवेत समाविष्ट करून घ्यायचं आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यातून निवड केलेल्या चालकांना ग्राहकांशी कसं बोलावं याचं प्रशिक्षण दिलं जातं. तसंच एखादी कॅब रस्त्यात बंद पडली तर जवळच्या शहरातून दुसरी कॅब त्याठिकाणी जाऊन ग्राहक किंवा प्रवाश्यांना इच्छित स्थळी सोडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही.
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीने sos सेवा सुरु करण्याचाही विचार असल्याचं निलेश पावसकर सांगतात. विविगोच्या प्रत्येक कॅब मध्ये एक sos बटन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. प्रवास करत असताना जर काही अडचण आली आणि प्रवाशाने हे बटन दाबल्यास, प्रवाशाने विविगो कडे नोंद केलेल्या नातेवाईकाच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज जाईल. त्यानंतर जर परत म्हणजे दुसऱ्यांदा बटन दाबल्यास दुसरा संदेश जवळच्या पोलिस ठाण्यात जाईल आणि तातडीने पोलिसांची मदत मिळेल अश्या प्रकारची सेवा उपलब्ध करण्यास विविगो प्रयत्नशील आहे. यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि इतर राज्यातील पोलिस विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचं पावसकर सांगतात.
पुणे मुंबई तसंच महाराष्ट्रातील प्रवाश्यांसाठी विविगो कॅब सेवा ही इतर कॅब सेवांच्या तुलनेत किफायतशीर आणि सुरक्षित कॅब सेवा उपलब्ध झाली आहे. तुम्हाला तातडीने कॅब हवी असल्यास wiwigo.com या संकेतस्थळाला भेट द्या.