पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी ʻइको एकोʼ
मुंबईत सुरू झालेल्या एखाद्या संस्थेचे फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून जवळपास ४५० सभासद तयार होणे, ही कदाचित आपल्याला अतिशयोक्ती वाटू शकते. मात्र ही सत्यपरिस्थिती आहे ती ʻइको एकोʼ (Eco-Echo) या निसर्गप्रेमी संस्थेची. दक्षिण मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालयात जीवशास्त्राशी संबंधित विषयांचा अभ्यास करणारी तसेच पर्यावरणाप्रति आपुलकी असणारी समविचारी मंडळी एकत्र आली आणि ʻइको एकोʼच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. दहा वर्षापूर्वी काम सुरू केलेल्या संस्थेची चार वर्षांपूर्वी नोंदणी करण्यात आली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या मंडळींना संशोधन काय असते, याची खऱ्या अर्थाने माहिती झाली. तेव्हा त्यांनी आपण एक संस्था सुरू करायची, असा निर्णय घेतला. तसेच आपल्या संस्थेत विविध शाखांशी संबंधित, विविध विषयांचा अभ्यास करणारी, त्यावर संशोधन करणारी समविचारी मंडळी जोडायचे ठरवले. याबाबत बोलताना संस्थेचे सभासद नितीन वाल्मिकी सांगतात की, ʻमाणूस जसा असतो, तशा पद्धतीचे मित्र त्याला भेटत जातात, असे मला वाटते. माझ्याबाबतीत तरी हा नियम तंतोतंत लागू पडला. ʻइको एकोʼ संस्थेत पर्यावरणाप्रति प्रेम असलेली विविध शाखांमधील माणसे जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्याला फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातूनदेखील चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हा आम्हाला जर्मनी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आर्य़लॅण्ड, दक्षिण आफ्रिका तसेच अमेरिका यांसारख्या विविध देशातून सभासद मिळाले. हे लोक वैयक्तिकरित्या संशोधनात बराच वेळ खर्च करायचे. कालांतराने आम्ही योग्य पद्धतीने आमचे काम सुरू केले. संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी आम्ही वयाच्या तुलनेत लहान होतो. त्यामुळे आम्ही वैयक्तिकरित्या संशोधन करण्याऐवजी गटाने संशोधन करायला प्राधान्य दिले. भारतात मुळात संशोधन किंवा रिसर्च हे लपून केले जाते. संशोधन करणारा आपण कोणत्या गोष्टीवर संशोधन करत आहोत, हे लोकांसमोर आणत नाही. त्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद किंवा पाठिंबाही आपल्या लोकांकडून तेवढा मिळत नाही. आमचे अनेक वरिष्ठदेखील असे होते, जे दोन-तीन वर्ष संशोधन करुन आपला अहवाल तयार करत होते. त्यामुळे आम्ही संशोधनात रस असलेल्या सर्वांना त्यात सहभागी करुन घ्यायचे ठरवले. एखादा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील श्रेयनामावलीत सर्वांचे नाव लिहिण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या या उपक्रमात एक-एक करुन बरेच लोक जोडले गेले. तसेच आम्ही अनेक संशोधन अहवालदेखील लिहिले.ʼ, असे ते या संस्थेच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगतात.


संशोधन क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की या संस्थेत सक्रियरित्या मुंबई आणि भारतातील राज्यांमधील सभासदच कार्यरत आहेत. ही स्वयंसेवी संस्था चालवण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी मग त्यांनी विविध पदांच्या निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी डिविजनल हेड पदांची निर्मिती केली. सध्या भुबेश गुप्ता हे त्यांचे ʻहेड ऑफ साऊथ इंडियाʼ (स्पेशली तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश), विजय पटेल हे त्यांचे ʻहेड ऑफ गुजरातʼ, डॉ. आलोक श्रीवास्तव हे त्यांचे ʻहेड ऑफ उत्तर प्रदेशʼ असून, अशा राज्यनिहाय मुख्य पदांची त्यांनी निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी विविध वनविभागांशी संपर्क करुन त्यांची कोणकोणती कामे पूर्ण होत नाहीत, याचा आढावा घेऊन कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता ती पूर्ण करण्याचा प्रय़त्न केला. त्याकाळी लोक त्यांना त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालांमुळे संशोधन करणारे किंवा वाईल्डलाईफ बायोलॉजिस्ट म्हणून ओळखत होते. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये पर्यावरणाप्रति जनजागृती करण्याचे काम सुरू केले. तसेच मानवी वस्तीत घुसलेल्या प्राण्यांना सोडवण्याचे काम सुरू केले. तेव्हा त्यांना यासंबंधीच्या प्रोटोकॉलची माहिती नव्हती किंवा हे सर्व काम कसे करायचे, याबाबतदेखील काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी वनविभागाच्या मदतीने एक कार्य़पद्धती निश्चित केली. तसेच लोकांमध्ये याबद्दल जनजागृती करण्यास सुरुवात केली.

साप दिसल्यावर ʻसळो की पळोʼ होणाऱ्या लोकांमध्ये त्यांनी सापांबद्दल जागृती करण्याचे काम केले. साप विषारी की बिनविषारी, हे कसे ओळखायचे, शहरी परिसर असेल तर तेथे सापाने प्रवेश का केला यासारख्या अनेक प्रश्नांवर ते लोकांमध्ये जनजागृती करतात. तसेच एखाद्या शहरी परिसरात जर वारंवार साप आढळत असेल, तर ते त्या परिसराला त्यांच्या यादीत रेड झोन म्हणून घोषित करतात. तसेच तेथे वारंवार साप का येतो, यावर संशोधन करुन त्याचा अहवाल तयार करतात. तेथील लोकांना त्याबाबतीत जागरुक करुन खबरदारीचे उपाय सांगतात. याबाबत ते कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नसल्याचे नितीन सांगतात. कालांतराने लोकांना ही संस्था विश्वासार्ह वाटू लागली. त्यानंतर त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले. याबद्दल बोलताना नितीन सांगतात की, ʻकसाऱ्यातील विही गावात पाण्याची टंचाई असल्याचे आमच्या लक्षात आले. तेथील नागरिकांना आम्ही पावसाच्या पाण्याचा संचय (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करण्यास शिकवले.ʼ एखादी संघटना किंवा संस्था जसजशी मोठी होत जाते, तसा तिचा सर्वांगिण विकासदेखील होत असतो, संस्थेतील सभासदांना नवनवीन कल्पना सुचू लागतात, असे बोलताना नितीन अभिमानाने सांगतात की, आजवर या संस्थेतून एकही व्यक्ती बाहेर पडलेला नाही.

आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना नितीन सांगतात की, ʻएखाद्या परिसरात साप किंवा एखादा वन्यजीव आढळल्यानंतर ते जवळच्या वनविभागाला त्याबाबत माहिती देण्यात येते. त्या परिसरातून तो वन्यजीव बाहेर काढल्यानंतर जवळच्या एखाद्या वन्यजीव स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिला जातो. ती संस्था नंतर तो वन्यजीव वनविभागाच्या ताब्यात देते.ʼ या संस्थेच्या उपक्रमाला लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना नितीन सांगतात की, ʻसाप म्हटल्यावरच लोक घाबरतात. साप चावला, या वाक्याचा त्यांच्यावर मानसिक प्रभाव एवढा पडतो की त्यात त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो, मग तो साप बिनविषारी असला तरी. लोकांच्या या भीतीचा अनेक खोटे सर्पमित्र फायदा उचलतात. एखाद्या परिसरात साप आढळला की ते त्या ठिकाणी जाऊन त्या सापाला पकडण्यासाठी तेथील स्थानिकांकडून हजारोंनी पैसे उकळतात. हा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नाही, सर्पमित्र हे त्यांच्या आवडीमुळे या क्षेत्रात येतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की, कोणीही अशा सर्पमित्रांना पैसे देण्याची गरज नाही. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही त्यांना प्रवासखर्च देऊ शकता. मात्र साप पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नाही.ʼ ʻइको एकोʼ या संस्थेच्या सभासदांनी त्यांच्या परिसरात पर्यावरण रक्षणासाठी बरीच कार्ये केली आहेत. निसर्गाच्या प्रकोपामुळे जंगलांवर मोठा परिणाम होतो. अनेकदा हे वन्यजीव जंगलातून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरकाव करतात. अशा प्राण्यांना पकडून पुन्हा जंगलात सोडण्याचे काम ही संस्था कोणतेही शुल्क न आकारता करते.
आदिवासी लोकांना रोजगार देण्याचा ʻइको एकोʼ ही संस्था प्रयत्न करते. जंगल सफारीकरिता किंवा संशोधनाकरिता जंगलात जाणाऱ्या पर्यटकांना ही संस्था तेथील आदिवासी लोकांकडे राहण्याचा किंवा जेवण खाण्यासाठी जाण्याचा आग्रह करते, जेणेकरुन पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळू शकतो. आजच्या युवा पिढीला सल्ला देताना नितीन सांगतात की, ʻमाझ्याकडे अनेक लोक याबाबत सल्ला घेण्यासाठी येतात. तेव्हा मी त्यांना सांगतो की, तुम्हाला खरोखरच या गोष्टीची आवड असेल, तर या क्षेत्रात या. पण जर तुम्ही पैसा कमविण्याच्या ध्येयाने या क्षेत्रात येत असाल, तर ते चूक आहे.ʼ

बांधकाम व्यवसायात असलेले विजय पटेल हे ʻइको एकोʼचे गुजरात हेड आहेत. आपल्या आजवरच्या अनुभवाबद्दल बोलताना ते सांगतात की, ʻनिसर्ग आपल्याला भरभरुन देत असतो, त्याची परतफेड करणे, जरुरीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी पर्यावरणसंबंधी काम करणाऱ्या या संस्थेशी जोडला गेलो. आजवर मी अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले आहे. मात्र एवढे नम्र आणि ध्येयवेडे लोक मी पहिल्यांदा पाहिले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था या पैसा कमविण्यासाठी काम करतात. मात्र ही संस्था पूर्णतः वेगळी आहे. सर्वांना एकत्र घेऊन ही संस्था काम करत असते. गुजरातमधील या संस्थेचे कोणतेही काम येथील टीम पूर्ण करतात. त्यासाठी खास इतर राज्यातील सभासदांनी यायची गरज नसते.ʼ विजय पटेल हे नुकतेच मध्यप्रदेशमधील बफर झोनमध्ये सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीजसोबत लेपर्ड ऑक्युपेन्सी सर्व्हेक्षणासाठी ३५ दिवसांकरिता तेथे गेले होते. त्यांनी गीर अभयारण्यात देखील लक्षणीय काम केले आहे. तसेच ते गीर अभयारण्यात २०१० सालापासून ʻनेचर एज्युकेटरʼ नामक एका कॅम्पचे आयोजन करतात. २००९ सालापासून ते सर्पमित्र म्हणून गुजरात येथे काम पाहतात. तर ʻइको एकोʼचे हेड ऑफ साऊथ इंडिया असलेले बुभेश गुप्ता सांगतात की, ʻया संस्थेच्या नावातच सर्व काही आहे. पेराल ते उगवते, या उक्तीप्रमाणे तुम्ही निसर्गाकरिता काही चांगले केले, तर तो तुम्हाला भरभरुन देईल. त्यामुळे आपण त्याचे रक्षण करणे, संवर्धन करणे गरजेचे आहे. ही संस्था जे काम करत आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. लोकांना जंगल, पर्यावरण यांची माहिती देणे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवने यात बराच फरक आहे. ही संस्था लोकांना पर्य़ावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करते. इथे दक्षिण भारतात आम्ही शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांना पर्यावरणाची माहिती देण्यासाठी आम्ही सेवा पुरवतो. पर्यावरणाविषयी जनजागृती आम्ही सातत्याने करत असतोʼ, असे ते सांगतात.
