नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग
देशात मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या दोन्ही अभियानाची जोरदार सुरवात झाली आहे. भारतात उत्पादन व्हावं यासाठी मेक इन इंडिया तर, नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी स्टार्टअप इंडिया ही अभियाने राबवण्यात येत आहेत. या दोन्हीचा फायदा महाराष्ट्राला मिळावा यासाठी मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाला पण सुरवात होणार आहे. एकूणच देशाची आणि राज्याची उद्योजकतेकडे जोमाने वाटचाल सुरु आहे.
तरीही अजूनही काही तरुणांना उद्योजक कसं बनावं. स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा असा संभ्रम आहेच. यावर अभिनव मार्ग शोधून काढला आहे पुण्याचा आन्त्रप्रेनियर्स ट्रेनिंग फाऊन्डेशनच्या अविनाश जोशी यांनी. जोशी यांनी युवकांना नवीन व्यवसाय कसा सुरु करावा आणि तो कसा वाढवावा याची माहिती मिळावी यासाठी चक्क मराठी ब्लॉग सुरु केला आहे.
अविनाश जोशी हे गेली २५ वर्ष व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यवसाय सुरु कसा करावा, तो कसा वाढवावा याचं मार्गदर्शन ते गेली अनेक वर्ष करत आहेत. त्यांच्या अनुभवानुसार अनेक युवक व्यवसाय सुरु करतात पण तो यशस्वीपणे चालवणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा असे व्यवसाय बंद पडतात.

देशात सुमारे ६ कोटी छोटे उद्योजक आहेत. नवीन उद्योजकांसाठी मुद्रा बँके माध्यमातून ९३ हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. याची माहिती युवकांना मिळावी. तसंच कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा सुरु करावा. व्यवसाय सुरु केल्यावर तो कसा वाढवायचा, नफा कसा कमवायचा, उच्च दर्जाची ग्राहक सेवा कशी द्यावी, आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं. याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचं जोशी यांना जाणवलं. व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी वेगळा प्रयोग करावा या उद्देश्याने अविनाश जोशी यांनी 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) हा व्हिडीओ ब्लॉग सुरु केला.
हा ब्लॉग सामान्य युवकांना समजावा यासाठी त्यांनी मराठी मध्ये हा ब्लॉग सुरु करायचा निर्णय घेतला. व्यवसाय वृद्धी विषयी वेगवेगळ्या विषयावर माहिती देणारा हा ब्लॉग आहे. प्रत्येक सोमवारी एका नवीन विषयावर या ब्लॉग च्या माध्यमातून माहिती दिली जाते. ५ ते ६ मिनिटांचा प्रत्येक व्हिडीओ असून, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली जाते. जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आलेला हा व्हिडीओ ब्लॉग ५२ आठवडे सुरु राहणार आहे.
तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे का? पण सुरवात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) या ब्लॉग ला भेट द्या. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या ठिकाणी होईल.

अविनाश जोशी यांनी हा ब्लाॅग सुरु करून पाच आठवडे झाले आहेत. पण या ब्लॉग च्या माध्यमातून मिळणारी माहिती ही उपयुक्त असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच यावर अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली जात असल्याने समजायला सोपी आहे. तसंच मोबाईल फोन च्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध झाल्याने, मोबाईल फोनवरही हा ब्लॉग बघणं शक्य झालं आहे.
नवीन उद्योजकांसाठी सरकार अनेक नवीन योजना सुरु करत आहे. पण त्याची माहिती युवकांना मिळत नाही. त्यामुळे अनेक नवीन व्यावसायिक व्यवसाय सुरु करतात आणि यशस्वी न झाल्याने व्यवसाय पुन्हा बंद करतात. पण 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) या व्हिडीओ ब्लॉग च्या मदतीने नवीन उद्योजकांना नक्कीच चालना मिळेल.
यासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अतिभव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मेक इन इंडिया’ देशातील पहिले-वहिले प्रदर्शन सप्ताहभर मुंबईत चालणार, अर्थात ‘मेक इन महाराष्ट्र’!
‘स्टार्टअप्स’करिता पंतप्रधानांची महत्वाची घोषणा, उद्योगांसाठी दहाहजार कोटींचा कोष, तीन वर्षांपर्यंत करात सूट
भारतातल्या बटाटा सम्राटांनी सीरीज-बी फंडींगमधून मिळवलेत २५ कोटी रुपये!
आणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.