मलाया गोस्वामी : शिक्षिका आणि समाजसेवक असलेली सिने तारका
एखादी सिने तारका समाजकारणात कार्यरत असेल यावर पटकन कोणाचा विश्वास बसणार नाही. पण एक आसामी तारका चक्क समाजसेवेत कार्यरत आहे. मलाया गोस्वामी उत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी पहिली आसामी अभिनेत्री.
ईशान्येकडील चित्रपट सृष्टीची फारशी माहिती आपल्याला नाही. पण तरीही मराठी सिनेमा किंवा टोलीवूड म्हणजेच तेलगु सिनेमा या भारतातल्या प्रादेशिक चित्रपट सृष्टीची जशी वेगळी ओळख आहे तशीच आसामी चित्रपट सृष्टीचीही वेगळी ओळख आहे. ईशान्येकडील राज्य अतिरेकी कारवायांमुळे जरी अस्थिर असतील तरी पण आसामी आणि मणीपुरी चित्रपट सृष्टी आपली वेगळी ओळख जपून आहे.

अशांत असलेल्या या ईशान्य प्रांतातील चित्रपट सृष्टीत मलाया गोस्वामी यांनी आपली अभिनेत्री आणि समाजसेवक अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मलाया अभिनेत्री जरी असल्या तरीही त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. गुवाहाटीच्या जगिरोद महाविद्यालयात त्या गेली सुमारे ३० वर्ष प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. "अभिनयाप्रमाणे शिकवणं हे पण मला मनापासून आवडतं", असं त्या सांगतात. याशिवाय महिला आणि लहान मुलांच्या विकासासाठी अर्पतिया ही स्वयंसेवी संस्था त्यांनी सुरु केली आहे. पर्यावरण विषयक आणि मनुष्य बळ विकास या संदर्भात काम करणाऱ्या एका संस्थेसाठीही त्या कार्यरत आहेत. बालवाडी प्रशिक्षण मंडळाच्या त्या पदाधिकारी आहेत. आसाम मधील इतर शैक्षणिक संस्थांवरही त्या कार्यरत आहेत. TeachAids या एड्स बाबत काम करणाऱ्या प्रकल्पातही त्यांचा सहभाग आहे.
त्या सांगतात," एड्स बाबत समाजात अनेक गैरसमज आहेत, आणि एक शिक्षिका आणि अभिनेत्री म्हणून मला समाजाचं काहीतरी देणं लागतं. एड्स विषयी असलेले गैरसमज दूर करणे आणि त्याबाबत योग्य माहिती समाजात पोहोचवणं हे माझं कर्तव्य असल्याचं मी मानते. TeachAids सारख्या प्रकल्पात माझा सहभाग आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे," असं त्या सांगतात.

पुणे अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आसामी दिग्दर्शक जानु बरुआ यांचा फिरींगोटी हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटासाठी १९९२ मध्ये मलाया गोस्वामी यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्या भारावून गेल्या.
मलाया गोस्वामी या मुळच्या दिब्रुगडच्या. त्याचं शालेय शिक्षण दिब्रुगड मध्ये झालं तर महाविद्यालयीन शिक्षण गुवाहाटीमध्ये. १९७५ मध्ये हेन्डीक कन्या महाविद्यालयातून पदवीधर झाल्या त्यानंतर १९७७ मध्ये गुवाहाटी विद्यापीठातून त्यांनी अध्यापन विषयातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यांना पहिल्या पासूनच कला क्षेत्राची आवड असल्याने, त्या चित्रपट क्षेत्राकडे वळल्या.
ज्येष्ठ आसामी दिग्दर्शक भाबेन्द्र नाथ सैकिया यांनी १९८७ मध्ये दिग्दर्शित केलेला अग्निस्नान हा त्यांचा पहिला चित्रपट. यामध्ये मालायानी मेनकेची भूमिका केली होती. या चित्रपटामुळे त्यांनी आसामी चित्ररसिकांच लक्ष वेधून घेतलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मालायाना हुलकावणी देऊन गेला.
मालायांचा दुसरा चित्रपट फिरंगोटी हा १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. जानु बरुआ यांनी तो दिग्दर्शित केला होता. यामध्ये मालायानी एका खेड्यात राहणाऱ्या महिलेची भूमिका केली होती. ही महिला आपलं वैयक्तिक दुःख विसरून गाव शिक्षित करण्यासाठी आपलं उर्वरित आयुष्य वेचते. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटासाठी मलाया गोस्वामी यांना उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही.
त्यांनतर उत्तरकाल, मां, आय किल्ड हिम सर, आसेने कोनोबा हियात, सेश उप्पहार, या आणि इतर आसामी सिनेमांमध्ये मालायानी काम केलं. चित्रपटाबरोबरच काही आसामी मालिकांमाधेही त्यांनी काम केलं. 'व्रीत्तू आहे व्रीत्तू जाई' ही त्यांची गाजलेली मालिका. आसाम मधील नामवंत अभिनेते आणि दिग्दर्शकांबरोबर मालायानी काम केलं आहे.
मलाया गोस्वामी यांचा अभिनय जसा उत्तम होता तसाच त्यांचा आवाजही चांगला होता. चित्रपट आणि मालिका याशिवाय त्यांनी ४० हून अधिक नभोनाट्य पण केली आहेत. आसामी आकाशवाणी वरून ही नभोनाट्य प्रसारित झाली.

अध्यापन आणि समाजकार्य हे मालायांना आवडतं त्याप्रमाणे त्या चित्रपटावरही भरभरून बोलतात, त्या म्हणतात, " आधी वर्षाला १२ ते १५ आसामी चित्रपट प्रदर्शित व्हायचे पण आता हा आकडा ५० ते ६० इतका झाला आहे. दरवर्षी प्रदर्शित होणाऱ्या आसामी चित्रपटांची संख्या वाढली आहे. पण त्यांचा प्रचार अजून व्हायला हवा. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे मराठी चित्रपटांना सरकार कडून निधी दिला जातो तसा निधी आसामी चित्रपटांना ही मिळावा," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्या सांगतात," आसामी चित्रपटांचा खरा प्रेक्षक हे असामी नागरिक आहेत, पण आसामच्या भौगोलिक परिस्थितीमुळे चित्रपट दर्शकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी आसाममध्ये अधिक चित्रपट गृहांची निर्मिती होणं गरजेचं आहे,"