दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !
सेंद्रीय शेती हा विषय आज जी-२० देशांच्या जागतिक परिषदेत देखील अधोरेखित करण्यात आला आहे. सेंद्रीय शेतीचे महत्व त्यामुळे आता सा-यांनाच पटले असावे. त्यादिशेने कृती करताना मात्र अनेकदा विलंब होताना दिसतो. मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी काय हवे असते तर शुद्ध हवा, पाणी, सकस अन्नधान्य. परंतु आज यातली एकही गोष्ट सहजपणे उपलब्ध होताना दिसत नाही. पण असा सात्विक भाजीपाला देण्याचा प्रयत्न ठाण्यातील दोघा अभियंता मित्रांनी केला. सतीश सूर्यवंशी, गिरीश अावटे या दोघा मित्रांना आणि त्यांच्या साथीदारांना गावाकडच्या त्यांच्या शेतात तसेच अन्य शेतकऱ्यांच्या सहाय्याने सेंद्रिय शेती करून, उत्पादीत भाजीपाला आणि फळे ग्राहकांच्या थेट दारात पोहचवण्याची संकल्पना सुचली.

सात्विकचे संस्थापक सतीश सूर्यवंशी, गिरीश अावटे
लोकसंख्यावाढीमुळे पाण्याची, प्रदूषणाची, बेरोजगारीची, अन्नधान्याची समस्या निर्माण झाली आणि एकूणच जीवनावश्यक घटकांचे संतुलन बिघडले. १९६० च्या दशकात जी हरितक्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याकडे लक्ष देण्यात आले, यात उत्पादन वाढले, मात्र उत्पादित मालाला गुणवत्ता राहिली नाही. लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा भागू लागल्या, मात्र शेतकरी आणि ग्राहक यांच्यात असलेल्या दलालांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे कष्टकरी शेतकरी हवालदिल झाला. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे पाणी, हवा, मिळणारी उत्पादने स्वच्छ राहिलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. रासायनिक खतांच्या वापराने शेतजमिनी नापीक झालेल्या दिसून येत आहेत. तेव्हा मूळ समस्या निवारण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे झाले आहे. नेमकी हीच गरज ओळखून ठाण्यातील या मित्रांनी घरपोच सात्विक भाज्या देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
पिकवलेला भाजीपाला पूर्णतः सेंद्रिय असला पाहिजे हे तत्व त्यांनी ठरवून घेतले. त्यानंतर या मित्रांनी सातारा आणि बारामती येथील काही शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. रासायनिक खतांचा आणि फवारणीचा वापर त्यांच्या जमिनीसाठी आणि ग्राहकांसाठी कसा घातक आहे हे सांगत देशी गायीच्या शेणखताचा वापर करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे सुचविले. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास उत्पन्न कमी होईल असे तिथल्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे होते, मात्र उत्पादन जरी कमी असले तरी या सेंद्रिय उत्पादनाला चांगला बाजारभाव तसेच बाजारपेठ मिळेल अशी हमी दिल्यावर शेतकऱ्यांनी त्यांची कल्पना मान्य केली. प्रथम तिथल्या प्रामाणिक शेतकऱ्यांची चाचपणी केली जे पूर्णतः सेंद्रिय शेतीउत्पादन घेतील. अश्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दलाली व्यवस्था मोडीत काढत, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या मदतीने डिसेंबर २०१४ मध्ये ‘सात्विक’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला शेतातून थेट स्वयपाकघरात पोहचवण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली.

ठाणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक शिंगारे
“सुरवातीला एका शेतकऱ्याकडून फळे, भाजीपाला घेण्यास प्रारंभ केला. त्याला योग्य तो हमी भाव मिळाल्यावर इतरही शेतकरी आमच्या या उपक्रमात सहभागी झाले आणि आज तब्बल ७५ ते ८० शेतकरी आम्हाला जोडले गेले आहे. विशेषतः मालेगाव-सातारा येथील विक्रम कदम व प्रमोद कदम, बारामती तालुक्यातील चोपडजचे महादेव निंबाळकर आणि संघवीचे शिर्के गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्या सहकार्यशिवाय हे काम करणे शक्यच नव्हते. प्रामाणिकपणे आणि झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच ‘सात्विक’ची पाळंमुळं घट्ट रोवली गेली असल्याचे गिरीश युअर स्टोरीशी बोलताना सांगतात.

सतीश सूर्यवंशी आणि गिरीश आवटे हे दोघेही व्यवसायाने अभियंता असून सतीश इलेक्ट्रॉनिक्स तर गिरीश हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. सतीश रिलायन्स, टाटा सारख्या नामवंत कंपन्याबरोबर उच्च पदावर कार्यरत होते. “ या ठिकाणी काम करत असताना आमचे वरिष्ठ पदाधिकारी नेहमी आॅरगॅनिक फूड प्राॅडक्ट बद्दल चर्चा करत असत. घरी शेती व्यवसाय असल्याकारणाने मला शेती व्यवसायाचे परिपूर्ण ज्ञान होते. माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना मी सहलीकरिता शेतावर घेऊन जात असे, त्यावेळी एकूणच शेती आणि सद्य परिस्थितीवर चर्चा होत असे आणि मग त्यातूनच सात्विकची कल्पना डोक्यात घर करू लागली” सतीश यांनी सांगितले. त्यांचे सहकारी गिरीश यांची स्वतःची इनफोकेअर टेकनॉलाॅजी ही कंपनी आहे. सध्या ते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सात्विकचे मार्केटिंग नेटवर्क विस्तृत करण्यास प्रयत्नशील आहेत. या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील कारकिर्दीला रामराम ठोकत पूर्णतः या कामात झोकून दिले आहे. अन्नधान्य, फळभाज्यांसंबंधी कॉर्पोरेट क्षेत्रातील गरज आणि सद्यस्थितील बाजारपेठ याची पुरेपूर जाण असल्याने तसेच या दोघांच्याही घरी शेती व्यवसाय असल्याकारणाने शेती करताना घेतले जाणारे कष्ट, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा, यासारख्या नानाविध समस्या आणि त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न. या आजघडीला भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्याचे काम या दुकडीने हाती घेतले आहे.

टीम सात्विक फूड
मुंबईसारख्या शहरात रेल्वेरूळानजीक सांडपाण्याचा वापर करत भाज्या पिकवल्या जातात आणि बाजारात उपलब्ध केल्या जातात. आपण जी फळे किवा भाज्या खातो त्या कुठून आल्या, कुठे आणि कश्या उगवल्या याची आपणा कोणालाही कल्पना नसते. सारं काही ‘दृष्टी आड सृष्टी’ असं चाललेलं आहे. दृष्टी आड सुद्धा एक सृष्टी असते आणि ती पण एवढी भयानक.... कालांतराने आरोग्यास या घातक भाज्यांचे दुष्परिणाम हे होणारच असे सतीश आणि गिरीश ठामपणे सांगतात. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा पालकपनीर मागवतो, तेव्हा शिजवलेला पालक रेल्वेरूळाजवळ पिकवलेला तर नाही ना ? याचा विचार करणेही गरजेचे असल्याचे हे दोघेजण सांगतात.
आज ग्राहकाला काय हवंय तर खात्रीशीर, नैसर्गिक, आरोग्यदायी अन्नधान्य, तेही वाजवी दरात आणि शेतकऱ्याला काय हवंय तर योग्य तो हमीभाव आणि खात्रीशीर बाजारपेठ. शेतातील फळभाज्यांचा थेट ग्राहकाच्या दारात पुरवठा केल्यास परस्परपूरक अशा दोघांच्याही गरजा पूर्ण होतात. दोन्हीकडे ‘विनविन सीच्युएशन’ निर्माण झाल्यास ग्राहकाला आपले आरोग्य जपता येईल तर शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाल्यास शेतकरी आत्महत्येसारख्या समस्या भेडसावणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी थोडाफार का होईना हातभार लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सतीश सांगतात.
‘सात्विक’ तर्फे फळे व भाजीपाल्याचे घरपोच वितरण :
सात्विक फूड या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कुटुंबाच्या आकारानुसार वेगवेगळ्या प्रकारची बास्केट तयार केलेली आहेत, या विषयीची विस्तृत माहिती www.satvikfood.in या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. चार ते पाच जणांच्या कुटुंबाला साधारणत: आठवडयाला पाच किलो भाजी लागते. त्यानुसार आठवड्याच्या भाजीचे एक बास्केट तयार केलेले आहे. आपल्याला हव्या त्या भाज्यांची ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर हे बास्केट घरपोच मिळते. थेट शेतातून येणारी ही भाजी ताजी असल्यामुळे आठवड्यापेक्षा जास्त दिवस ती सहज टिकू शकते. २० ते २५ प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, गाजर, काकडी, यासारखे सात ते आठ प्रकारचे सॅलेड तसेच मिरची, कोथींबीर, आलं यासारख्या ओल्या मसाल्याचे पॅकेज या बास्केटमध्ये असते. दलाल मंडळीना चुकवून ही सेवा थेट शेतातून घरपोच असल्याकारणाने या फळ, भाज्यांचे दरही किफायतशीर आहे.
http://www.satvikfood.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल एसएमएसद्वारे ग्राहक आठवड्याला लागणाऱ्या भाजीपाल्याची नोंदणी नोंदवतात. त्यानुसार हा भाजीपाला मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पाठविला जातो. १०० ग्रॅम लसून, १०० ग्रॅम आले, ४ लिंबू, मिरची कढीपत्ता हा मिर्च-मसाला वेष्टन करून पाठविण्यात येतो, त्याचबरोबर केळी,कारली, मुळा, शेवगा, चिकू बिट, वांगी, बटाटे, वाटणा, वाल, मेथी, गाजर आणि घेवडा यांच्या जोडीला सेंद्रिय गुळ, काकवी देखील ग्राहकांच्या स्वयपाक घरापर्यंत पोहचवली जाते.
आजघडीला सात्विकचे बाराशेहून अधिक ग्राहक असून, दिवसेदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता शेतकऱ्यांचे नेटवर्कही वाढत आहे. सध्या ठाणे, मुलुंड, ऐरोली, गोरेगाव, पवई या मुंबईतील उपनगरांमधील ग्राहकांना सेंद्रिय भाजीपाला मागणीनुसार पुरविला जातो.
सेंद्रिय शेती पद्धती :
आपल्याला उपलब्ध झालेल्या फळभाज्या या सेंद्रिय आहेत हे कशावरून ओळखायचे ? असे विचारले असता त्यावर ते म्हणाले की, “ तुम्ही चव चाखून पहा तुम्हाला रासायनिक आणि सेंद्रिय यातला फरक निश्चितच जाणवेल”. सेंद्रिय शेतीसाठी पूर्णतः देशी बी-बियाणांचा वापर केला जातो ”. थोडक्यात सेंद्रिय किंवा ऑरगॅनिक शेती म्हणजे काय तर निसर्गाचे संतुलन राखून नैसर्गिक पध्दतीने शेती उत्पादन घेताना जैवतंत्रज्ञानाचा वापर करणे ही मूळ संकल्पना. जमिनीची सुपीकता कायम राखली जावी. सेंद्रिय शेतीमध्ये गाईचे महत्व अनन्यसाधारण आहे. देशी गाईच्या शेणामध्ये अनेक घटक असतात. गाईपासून आपल्याला शेणखत, कंपोस्ट खत मिळते तसेच गोमुत्र हे कीटक नियंत्रणासाठी पिकांवर फवारले जाते. गोमुत्र आणि शेणखत आंबवले जाते ज्यामध्ये लिंबाची पाने, रुईची पाने, लसून तसेच १० ते १२ प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. या मिश्रणाचा वापर कीटक नियंत्रणासाठी केला जातो. कोणतेही कृत्रिम खते वापरली जात नाही. अशा पद्धतीने उत्पादीत केलेले धान्य कसदार असते. त्यात जास्त प्रथिने असतात. सात्विक कडे स्वतःची गोशाळा आहे. ज्यामध्ये पंचवीस खिलारी गाई आहेत. भाकड गाईंचा वापर विशेषतः शेणखतासाठी केला जातो.
शेतकरी गटाला प्रशिक्षण
सात्विक फुडसाठी कार्यरत असलेल्या शेतकरी गटाला वेळोवेळी शेतीतज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन तसंच प्रशिक्षणाचं आयोजन केलं जातं ज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेण्याबाबत सांगितलं जातं. खतं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. काढणीपश्चात तंत्रज्ञान, भाजीपाल्याची योग्य हाताळणी, विक्री व्यवस्था इत्यादी बाबत मार्गदर्शन केलं जातं.
सात्विक मुळे गावाकडे रोजगार निर्मितीत हातभार
शेतकऱ्याकडून आलेला सेंद्रिय भाजीपाला स्वच्छ धुवून निवडून ठेवला जातो. संपूर्ण मालाचे पॅकेजिंग शेतातच केले जाते त्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य वजनात पॅकिंग केला जातो. यासाठी तिथल्या स्थानिकांना चांगला रोजगार निर्माण झाला आहे. तयार माल वातानुकूलित व्हॅनद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो
भविष्यातील योजना
६० ते ७० प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पन्न घेणे, त्यांचे पॅकेजिंग करणे आणि ग्राहकांपर्यंत सुस्थितीत पोहोचवणे फारच जिकरीचे काम आहे, पण आम्ही ते नेटाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्यात कडधान्ये तसेच इतरही पीक उत्पन्न घेण्याचा सत्विक फुडचा प्रयत्नशील आहे. शहरातील मुलांना किवा तरुणांना प्रत्यक्षात शेती कशी करावी किंवा आपण जे अन्न खातो ते कश्या पद्धतीने पिकवले जाते याचा अभ्यास व्हावा यासाठी प्रयोगशील अग्रो-टूरिझम राबवण्याचाही त्यांचा मानस आहे.
आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.