शारदीय नवरात्र नऊ दिवस देवीची पूजा : घटस्थापना!
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेलं आढळते.

नवरात्री उत्सव दुर्गापूजा, नवरात्रोत्सव आणि त्याचे व्रत
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.
व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.क्वचित होमहवन व बलिदानही करतात.नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.
देवीची नऊ रूपे
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
जुनीगंगा माता कोपरगाव माहात्म्य
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते, अशी कल्पना आहे. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा आहे. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो.यामुळे आपल्या नवीन शक्ती,नवा उत्साह,उमेद निर्माण होत असते.बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणा-या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो.सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होवून बौद्धिक विकास होतो.म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काल आहे असे मानले जाते.
कोल्हापूर येथील अंबाबाई जोगवा
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारुड रचले आहे.ते असे- अनादी निर्गुण प्रगटली भवानी |
मोह महिषासुर मर्दना लागुनी ||
त्रिविध तापांची कराया झाडणी |
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी |
आईचा जोगवा जोगवा मागेन |
द्वैत सारुनी माळ मी घालीन |
हाती बोधाचा झेंडा घेईन |
भेदरहित वारिसी जाईन|
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा |
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा |
या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत. नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.
ललिता पंचमी
आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात. हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते.ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. यात एखाद्या करंडकाचे झाकण तिचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. दुर्गानवमी- आश्विन शुद्ध नवमीस हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात.या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र असा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घागरे, वडे वगैरे पदार्थ करतात.पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण,व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.
महाअष्टमी
महालक्ष्मीव्रत हे एक व्रत या दिवशी करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा.मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा परींची पत्री व फुले वहावीत.सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा.पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी.मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा.मग सोळा दूर्वा आणि सोळा अक्षता हातात घेवून महालक्ष्मीची कथा ऐकावी.
तांदुळाच्या पिठाचा मुखवटा- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजल कुंकवाने रेखाटतात. हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात. मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात. मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो. घागरी फुंकणे-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात.घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते.कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्व आहे.
महानवमी
एक तिथीव्रत. आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे.प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे हा या व्रताचा विधी आहे.
नवरात्री पूजा विजयादशमी
आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात..चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दस-याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे. दस-याला पौराणिक व ऐतिहासिक महत्वही आहे. म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात.दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात.रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.
नवरात्रातील नऊ माळा
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
नवरात्रातील नऊ रंग
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-.
२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण पहायला मिळते.
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्सने बहुसंख्य सामान्य आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.
दि क्विंट डॉट कॉमच्या आशिष दिक्षीत यांच्या मतानुसार, २००३ मध्ये विशिष्ट मराठी दैनिकाचा खप वाढविण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळे रंग वापरण्याचे सुचवणे आणि प्रचलीत करणे ही वृत्तपत्राच्या विपणन विभागाने वापरलेली आधुनिक कालिन केवळ जाहिरात युक्ती होती यास ऐतिहासिक अथवा धार्मिक आधार नसावेत.
पेशव्यांचा नवरात्रोत्सव
मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणार्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.
भोंडला
नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याभोवती फेर धरण्याचा हा कार्यक्रम असतो. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातप्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचेप्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्यासुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.
देवीची ओटी भरणे
१. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
२. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
३. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.
४. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
५. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
गरबा खेळणे म्हणजे काय ?
गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे. टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे हा उद्देश असावा. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्तियुक्त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धती अनुभवाला येते.गुजरातेत अशा प्रकारचा उत्सवपरंपरेने साजरा केला जातो. त्याला दांडिया (नृत्य) म्हणतात
( साभार, संकलीत)