मध्यमवर्गीय घरातील असंख्य तरुणांच्या प्रेमाचा आदर्श म्हणजे दगडू - अभिनेता प्रथमेश परब
बालक पालक या रवी जाधव दिग्दर्शित सिनेमात त्याने विशू साकारला आणि तो पहिल्यांदा सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर आला. खरंतर विशूची व्यक्तिरेखा ही बालक पालक सिनेमात तशी दुय्यम दर्जाचीच होती. सिनेमातल्या महत्वाच्या चार शाळकरी मुलांना हवं ते उपलब्ध करुन देणारा हा विशू. त्यांच्याच वर्गातला पण त्यांच्या पठडीतला नक्कीच नाही. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेवढे प्रेम या चार बालकलाकारांना मिळाले तेवढेच प्रेम आणि कौतुक विशूची भूमिका साकारणाऱ्या प्रथमेशला मिळालं.
बालक पालकनंतर टाईमपास या रवीच्या पुढच्या सिनेमात प्रथमेशची दगडूच्या मुख्य भूमिकेत लागलेली वर्णी यावरुन हे स्पष्ट झालंच. टाईमपासमध्ये प्रथमेशच्या अभिनयाची खरी कसोटी लागली ज्याला तो पुरुन उरला. कारण सिनेमाचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आणि हा दगडू लोकांच्या घराघरात पोहचला. पौगंडावस्थेतल्या निष्पाप निरागस प्रेमाचा हा दगडू जणू प्रतिनिधीच बनला.

पण प्रथमेशची वाटचाल इथेच थांबली नाही, यानंतर टाईमपास 2, उर्फी आणि अगदी दृष्यम या हिंदी सिनेमातही तो झळकला आणि अक्षरशः छा गया. आज प्रथमेशचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. मराठीतल्या बहुतांश कलाकारांप्रमाणेच प्रथमेशची अभिनय क्षेत्रातली ही वाटचाल महाविद्यालयीन एकांकीकांपासून झाली हे महत्वाचे.
प्रथमेश सांगतो, “बालक पालक सिनेमा हा डहाणूकर महाविद्यालयाच्या बालक पालक या एकांकीकेवर आधारलाय. अंबर हडप आणि गणेश पंडित लिखित ही एकांकीका आम्ही आंतर महाविद्यालयीन नाटयस्पर्धांमध्ये सादर करायचो. तेव्हा ही एकांकीका खूप गाजलेली, तिला भरभरुन प्रतिसाद मिळत होता. याचदरम्यान एकदा रवी जाधव आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बालक पालक वर मी सिनेमा बनवतोय आणि तुम्ही या सिनेमाचा भाग बनू शकता, यासाठी तुम्ही ऑडिशन द्यायला या.
मी एकांकीकेमध्ये विशूचीच भूमिका करायचो त्यामुळे मी विशूच्या व्यक्तिरेखेसाठीचं ऑडिशन दिलं आणि निवडलो गेलो. खरंतर पहिल्यांदा सिनेमात अभिनय करताना खूप टेंशन आलं होतं, जमेची एकच गोष्ट होती की माझ्यासाठी विशू साकारणं नवीन नव्हतं फक्त माध्यम वेगळं होतं. पण रवी सर, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आणि अंबर गणेश यांनी खूप मदत केली. खरंतर आजही मी जेव्हा महाविद्यालयांमध्ये पाहुणा म्हणून जातो तेव्हा सिनेमातल्या संपदा आणि सानपाडाचा सीन मला अनेकजण येऊन येऊन सांगतात.”

एखाद्या नायकाला साजेसा देखणा रुबाबदार चेहरा आपल्याकडे नाही याची प्रथमेशला जाणीव आहे. “मराठी सिनेमांमध्ये कलाकाराच्या दिसण्यापेक्षा त्याच्या अभिनयाला अधिक प्राधान्य आहे, म्हणूनच दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे पासून ते अगदी आत्ताचे सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, संजय नार्वेकर सारखे सुपरस्टार आपल्याला मिळाले. मला नेहमीच लोकांना हसवायला आवडायचं आज मी तेच काम सिनेमाच्या पडद्यावर करतोय ज्याने मला नवी ओळख दिलीये, प्रेक्षकांचे प्रेम दिलेय, लोकांनी माझ्या पहिल्याच सिनेमात मला एक कॉमेडियन म्हणून स्वीकारलं होतं. पण टाईमपास 2 मुळे प्रेक्षकांनी एक रोमँटीक हिरो म्हणूनही माझ्याकडे पहायला सुरुवात केलीये, उर्फी सिनेमामुळे यात अधिक भर पडली.”
अर्थात या क्षेत्रात माझी सुरुवात ही अपघाताने झाली पण आता हे क्षेत्र मी करिअर म्हणून निवडलेय. त्यामुळे फिट असणं हे या क्षेत्रात गरजेचं आहे. मी आता जिममध्ये जातो, व्यायाम सुरु केलाय अगदीच सिक्स पॅक नाही तरी योग्य शरीरयष्टी बनवण्यासाठी मी प्रयत्न करतोय.”
एका सर्वसामान्य घरातनं आलेल्या प्रथमेशशी बोलताना त्याच्यातला साधा सरळ मुलगा अनेकदा डोकावताना दिसतो. “माझा जन्म कोकणातला, इथे मुंबईत आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अगदी रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही आम्हाला तडजोड करावी लागायची. मी माझी कॉलेजची फी भरण्यासाठी ट्युशन्सही घेतलेत. पण आता परिस्थिती बदललीये. विशू, दगडू, देवा या सगळ्यांनी मला फक्त ओळखच नाही मिळवून दिली तर जगण्याची नवी दिशा दिलीये. आज मी अभिनयाच्या या क्षेत्रात माझं आवडतं काम करतोय, सोबत माझ्या खाजगी आयुष्यातल्या जबाबदाऱ्या मी पार पाडू शकतोय याचा मला आनंद आहे.”

लवकरच लालबागची राणी या सिनेमातनं एका अनोख्या भूमिकेत प्रथमेश दिसणार आहे. हिंदीतले आघाडीचे निर्माते बॉनी कपूर या सिनेमातनं मराठीत निर्माते म्हणून पदार्पण करतायत. सिनेमा अजूनही निर्मितीवस्थेत असल्याने तो याबद्दल फारसं काही सांगू शकत नाही. सिनेमामध्ये काम करत असतानाच प्रथमेशने नाटक आणि एकांकीकांमध्ये काम करणं थांबवलं नाही. नुकताच झोपाळा या त्याच्या नाटकाचा समारोपाचा प्रयोग पार पडला.
“व पु काळे आणि रत्नाकर मतकरी यांच्या दोन वेगवेगळ्या कथांवर आधारित दोन नाटकांचा एकत्र कलाविष्कार म्हणजे झोपाळा. मी आणि बालक पालक सिनेमातली चिऊ म्हणजेच भाग्यश्री शंकपाळ या एकांकीकेमध्ये एकत्र काम करत होतो. आमच्या कॉलेजच्या या एकांकीकेला प्रायोगिक नाटकाचे रुप देऊन आम्ही या नाटकाचे वर्षभर प्रयोग सादर केलेत, खरंतर प्रायोगिक रंगभूमीवरचा हा माझा पहिला अनुभव होता. ज्याला मराठीतल्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी पसंतीची पावतीही दिली. झोपाळा सोबत बालक पालक या एकांकीकेलाही आम्ही प्रायोगिक रंगभूमीवर आणलं होतं.”
सध्याच्या इतर मराठी कलाकारांप्रमाणेच प्रथमेशही सोशल नेटवर्किंगवर चांगलाच सक्रीय आहे. त्याने नुकताच स्वतःचा यु ट्युब चॅनलही सुरु केलाय. यातनं तो त्याच्या चाहत्यांशी फेस टू फेस कनेक्ट होऊ शकणार आहे. प्रथमेशला त्याच्या या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा...